आठवडय़ापूर्वीच्या उच्चांकाला मागे टाकणाऱ्या दोन्ही प्रमुख निर्देशांकांची मंगळवारची अखेर मात्र माघारीची ठरली. व्यवहारात २२,०४०.७२ असा सर्वोच्च स्तर गाठल्यानंतर सेन्सेक्सने दिवसाची अखेर २१,८३२.६१ वर नोंदविली. तीन दिवसांनंतर खुल्या झालेल्या मुंबई निर्देशांकाने शुक्रवारच्या तुलनेत अवघ्या २२.८१ अंशांची वाढ राखली. व्यवहारात ६५७४.९५ पर्यंत पोहोचलेला निफ्टीही दिवसअखेर १२.४५ अंश वाढीने ६५१६.६५ वर स्थिरावला. अखेरच्या क्षणी गुंतवणूकदारांच्या नफेखोरीने दोन्ही निर्देशांकांना त्यांच्या नव्या ऐतिहासिक उच्चांकावरून खाली खेचले.
शुक्रवारच्या बंदसह सेन्सेक्सने दिवसाची सुरुवातही तेजीसह केली. याचबरोबर दिवसाच्या सुरुवातीलाच त्याने ऐतिहासिक टप्पा गाठला. यावेळी तो २२,०४०.७२ वर पोहोचला. याच माध्यमातून मुंबई निर्देशांकाचा १० मार्चचा २२,०२३.९८ हा स्तरही मागे पडला. तर ११ मार्च रोजी ६५६२.८५ अशा सर्वोच्च स्तरावर पोहोचलेल्या निफ्टीनेही मंगळवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात ६५७४.९५ हा पुढचा टप्पा गाठला. क्रिमियावरून युक्रेनची राजकीय अस्थिरता आणि अमेरिकन फेडरल रिझव्र्हची आगामी बैठक यांचे पडसाद जागतिक शेअर बाजारावर पडले असतानाच, त्याला येथील निर्देशांकांनीही मध्यल्या सत्रात साथ दिली. परिणामी दिवसअखेर सेन्सेक्स तसेच निफ्टी वधारणेत राहिले असले तरी त्यातील तेजी रोखली गेली.
ल्ल वर्षअखेर निफ्टी ७६०० वर!
अमेरिकेची ब्रोकरेज कंपनी असलेल्या गोल्डमॅन सॅक्सने राष्ट्रीय शेअर बाजाराचा- निफ्टी निर्देशांक डिसेंबर २०१४ अखेर ७६०० पर्यंत पोहोचेल, असा आशावाद व्यक्त केला आहे. भारतीय भांडवली बाजाराच्या निर्देशांकांचे अद्ययावत करताना देशाची अंतर्गत अर्थव्यवस्था आगामी कालावधीत उंचावणारी असून, या देशासाठीची आंतरराष्ट्रीय चिंताही कमी होणारी असेल, असे गोल्डमॅन सॅकने म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत देशाचा विकास अधिक वृद्धिंगत ठरणारा असेल, असेही याबाबतच्या अहवालात म्हटले आहे. सुधारणा प्रक्रियेसाठी लोकसभेच्या आगामी निवडणुका हा एक मुख्य परिणामकारक घटक ठरेल, असेही नमूद करण्यात आले आहे. निवडणुकांपासून ओएनजीसी, कोल इंडिया, आयसीआयसीआय बँक, लार्सन अॅण्ड टुब्रो या समभागांना लाभ होईल, असेही या आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज कंपनीने म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा