आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झालेले कच्च्या तेलाचे दर व व्याजदर कपातीबाबत निर्माण झालेली आशा हे घटक विदेशी गुंतवणूकदारांना भांडवली बाजाराकडे पुन्हा आकर्षित करण्यात यशस्वी ठरले. परिणामी या सकारात्मक घडामोडींच्या जोरावर सेन्सेक्सने २८ हजारांचा तर निफ्टीने ८,५००चा पल्ला आठवडय़ाच्या तिसऱ्या व्यवहारात पार केला. प्रमुख निर्देशांक आता तिमाहीतील वरच्या टप्प्यावर पोहोचले आहेत.
२६५.३९ अंशवाढीसह सेन्सेक्स २८,१९८.२९ पर्यंत गेला. तर ६९.७० अंशवाढीमुळे निफ्टी ८,५२३.८० वर पोहोचला. दोन्ही निर्देशांकांत प्रत्येकी जवळपास एक टक्क्याची वाढ नोंदली गेली. व्यवहारात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा मोठा हिस्सा राहिला. त्यांनी मंगळवारी बाजारात २७० कोटी रुपयांची खरेदी केली होती. गेल्या काही सत्रांपासून त्यांचा निधी ओघ रोडावत होता.
अणू ऊर्जा करारावर इराणने स्वाक्षरी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर मंगळवारपासून कमालीने घसरण्यास प्रारंभ झाला. प्रति पिंप हे दर आता ५७ डॉलपर्यंत घसरले आहेत. यामुळे येथील बाजारातही तेल कंपन्यांच्या समभागांचे मूल्य वाढत आहे. महागाईच्या ताज्या आकडेवारीवर रिझव्‍‌र्ह बँकेकडून पतधोरणात व्याजदर कपातीची आशा अधिक उंचावल्याने गुंतवणूकदारांनीही बुधवारी खरेदीचा जोर वाढविला.
गेल्या सलग दोन व्यवहारांत सेन्सेक्सने २८ हजारांचा प्रवास अनुभवला; मात्र दोन्ही सत्रात बंदअखेर या टप्प्यावर त्याला राहण्यात यश आले नाही. बुधवारी मात्र तसे प्रत्यक्षात घडले. २८,०२२.१४ने तेजीसह सुरुवात करणारा सेन्सेक्स दिवसभरात २८,२१८.३७ पर्यंत पोहोचला. दिवसअखेर त्यात मंगळवारच्या तुलनेत अडीचशेहून अधिक अंशांची वाढ झाल्याने निर्देशांक २८,२०० नजीकच बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही बुधवारी ८,५००चा उल्लेखनीय स्तर पार केला. व्यवहारात ८,५३१.४० पर्यंत मजल मारल्यानंतर निफ्टी दिवसअखेरही ८,५००च्या पुढे राहिला. निर्देशांकाची ही १७ एप्रिलनंतरची वाढ आहे. सेन्सेक्समध्ये वरचढ ठरणाऱ्या मारुती सुझुकीने ४,१८२ रुपयांना स्पर्श करत त्याचा सार्वकालीन उच्चांक मूल्य नोंदविला. टाटा मोटर्स, विप्रो, टीसीएस, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, ल्युपिननेही सेन्सेक्समध्ये मोठी वाढ राखली.
इराणबरोबरच्या अणू ऊर्जा कराराचा लाभ भारतासारख्या मोठय़ा प्रमाणात तेल आयात करणाऱ्या देशाला होणार असल्याने बाजाराने बडय़ा तेजीसह स्वागत केल्याचे हेम सिक्युरिटीजचे संचालक गौरव जैन यांनी म्हटले आहे. सेन्सेक्समध्ये २७ समभागांचे मूल्य वाढले. अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हच्या बुधवारी उशिरा होणाऱ्या बैठकीवर नजर ठेवत आशियाई तसेच युरोपीय बाजारातही तेजी नोंदली गेली.