ओएफएस टेक्नॉलॉजीज लिमिटेडने ‘बीएसई एसएमई’ मंचावर सूचिबद्धतेसाठी आपल्या १७.०४ लाख समभागांची प्रारंभिक खुली भागविक्री (आयपीओ) येत्या २८ डिसेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान प्रस्तावित केली आहे. एकूण प्रारंभिक भागविक्रीच्या दृष्टीने दमदार कामगिरीचे वर्ष राहिलेल्या २०१५ सालातील ही बहुधा शेवटची भागविक्री असेल.
सॉफ्टवेअर उत्पादने विकास क्षेत्रातील प्रतिथयश अशा चेन्नईस्थित ओएफएस टेक्नॉलॉजीजने ३० सप्टेंबर २०१५ रोजी समाप्त तिमाहीमध्ये २.४१ कोटींच्या उलाढालीवर ५६ लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. प्रत्येकी २५ रुपये अशा स्थिर किमतीला समभागांची विक्री करून कंपनी ४.२६ कोटी रुपयांचा निधी उभारू इच्छिते. व्ही. बी. देसाई फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस या भागविक्रीची व्यवस्थापक, तर बिगशेअर सव्‍‌र्हिसेस प्रा. लि. ही कंपनी निबंधक म्हणून काम पाहत आहे.
ही बीएसई एसएमई मंचावर सूचिबद्धतेसाठी भागविक्री असल्याने व्यक्तिगत गुंतवणूकदारांना किमान ६,००० समभागांसाठी (१.५० लाख रुपये रकमेचा) बोली लावणारा अर्ज करावा लागेल. गेल्या तीन वर्षांत बीएसई एसएमई मंचावर सूचिबद्ध छोटय़ा कंपन्यांच्या संख्येने शतकाचा आकडा ओलांडला आहे.

Story img Loader