करोना संक्रमणामुळे वाढत्या अस्थिरतेचा परिणाम समभाग गुंतवणुकीवर झाला आहे. आर्थिक वर्ष २०१९ मध्ये समभाग गुंतवणूक करणाऱ्या  फंडातील १.१२ लाख कोटींच्या गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर २०२० मध्ये ८१.६० हजार कोटी समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडांत गुंतविण्यात आल्याचे ‘अ‍ॅम्फी’च्या आकडेवारीत समोर आले आहे. आर्थिक वर्ष २०२० मध्ये आर्थिक वर्ष २०१९च्या तुलनेत २७ टक्के घट झाली आहे. समभाग गुंतवणुकीत घसरण झाली असली तरीसुद्धा समभाग गुंतवणुकीच्या वाढीत सातत्य राखणारे हे सहावे वर्ष आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (‘अ‍ॅम्फी’) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, समभाग फंडातील निव्वळ गुंतवणूक आर्थिक वर्ष २०१८ मध्ये १.७१ लाख कोटी, आर्थिक वर्ष २०१७ मध्ये ७० हजार कोटी, आर्थिक वर्ष २०१६ मध्ये ७४ हजार कोटी तर आर्थिक वर्ष २०१५ मध्ये ७१ हजार कोटी होती. आर्थिक वर्ष २०१४ मध्ये समभाग फंडातून ९ हजार कोटी गुंतवणूकदारांनी काढून घेतले होते. मागील आर्थिक वर्षांत गुंतवणूकदारांनी मार्चमध्ये ११ हजार कोटी समभाग गुंतवणूक करणाऱ्या  फंडात गुंतविले. मागील आर्थिक वर्षांतील ही सर्वाधिक गुंतवणूक आहे. मागील आर्थिक वर्षांतील फेब्रुवारी महिन्यात १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. ही त्या आर्थिक वर्षांच्या ११ महिन्यांतील सर्वाधिक गुंतवणूक होती. ‘कोविड १९’ च्या साथीची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर व्यापक बाजारपेठेत अस्थिरता वाढल्याचे दिसून येत आहे. शेअर बाजारातील वाढत्या अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांना फेब्रुवारी आणि मार्चमध्ये इक्विटी फंडामध्ये गुंतवणूक करण्यात हात आखडता घेतला नसला तरी भविष्यात गुंतवणूकदार बाजारातून समभाग गुंतवणूकदार निधी काढून घेण्याची शक्यता आहे. मार्च २०१९ मधील व्यवस्थापनाखालील मालमत्तेत ७.७३ लाख कोटींवरून घट होत मार्च २०२०मध्ये व्यवस्थापना खालील मालमत्ता ६.०३ लाख कोटींवर आली. तथापि आर्थिक वर्ष २०१९ मध्ये नियोजनबद्ध गुंतवणुकीचा (एसआयपी) वाटा ९२ हजार कोटीवरून आर्थिक वर्ष २०२० मध्ये १ लाख कोटींपेक्षा अधिक झाला. मागील आर्थिक वर्षांत दरमहा सरासरी २७५० गुंतवणूक करणारी ९.९५ लाख एसआयपी खाती उघडण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्याचे आकर्षक मुल्यांकन पाहता गुंतवणूकदारांनी समभाग गुंतवणुकीत हात आखडता न घेणे हे त्यांच्या हिताचे ठरेल. इतिहासात वेगवेगळ्या कारणांनी जेव्हा बाजार कोसळला त्यानंतर दोन वर्षांंनी सर्वोत्तम परतावा मिळाल्याचे दिसून येते.

– ओंकेश्वर सिंग, रॅक एमएफ सॅमको सेक्युरीटीज.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tide to equity fund investments abn