डिसेंबरमधील किरकोळ तसेच घाऊक महागाई निर्देशांकाने कमालीचा सोसलेला उतार एकीकडे रिझव्‍‌र्ह बँकेला व्याजदर कपातीबाबत सबळ कारण सांगितला जात असतानाच खुद्द बँकेच्याच पतधोरणावरील समितीने प्रस्तावित केलेला महागाईपेक्षा अधिकच्या रेपो दरामुळे मंगळवारच्या पतधोरणातील स्थिर व्याजदराचीही शक्यता मावळली आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन हे चालू तिमाहीतील पहिले पतधोरण मंगळवारी जाहिर करणार आहेत. गव्हर्नरांनी यापूर्वी स्थिर व्याजदराचे धोरण अवलंबिले होते. यंदाही ती शक्यता असताना किंबहुना कमी होणाऱ्या महागाईने त्यात कपात अपेक्षित असतानाच गेल्या आठवडय़ात सादर झालेल्या ऊर्जित पटेल समितीच्या शिफारशींनी अनिश्चितता निर्माण केली आहे.
अर्थव्यवस्थेचा मंदावलेला प्रवास पाहता उद्योग क्षेत्रातून व्याजदर कपातीची मागणी वेळोवेळी नोंदली गेली आहे. मात्र गेल्याच आठवडय़ातील नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात राजन यांनी महागाई सध्या चिंताजनक स्तरावरच असून ती रिझव्‍‌र्ह बँकेला व्याजदर कमी करण्यापासून अटकाव करत असल्याचे नमूद केले होते. नोव्हेंबरमध्ये देशाचा औद्योगिक उत्पादन दर उणे २.१ राहिला आहे.
डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर १० टक्के तर घाऊक किंमत निर्देशांक ८ टक्क्य़ांच्या खाली स्थिरावला होता. घाऊक किंमत निर्देशांक तर ६.१६ टक्के असा गेल्या पाच महिन्यातील किमान स्तरावर आला असताना तो रिझव्‍‌र्ह बँकेच्या ७ टक्के अंदाजापेक्षाही कमी नोंदला गेला आहे. एकूण महागाई दरात वाढत्या अन्नधान्याच्या किंमतींचा दबाव कायम असल्याचे केंद्रीय अर्थस्तरावरही नमूद करण्यात आले आहे.
जागतिक अर्थव्यवस्था, प्रमुख देशांच्या मध्यवर्ती बँकेशी समकक्ष राहताना पटेल समितीने सरकारऐवजी रिझव्‍‌र्ह बँकेचे स्वत:चे महागाई दराचे उद्दिष्ट निश्तिच करावे, अशी शिफारस केली होती. पतधोरण निश्चितीसाठी किरकोळ महागाई दरच गृहित धरण्याचे मत मांडले होते. समितीच्या या शिफारसी अद्याप रिझव्‍‌र्ह बँकेने स्विकारल्या नसून त्याची अंमलबजावणी केव्हाही होऊ शकते.
या धास्तीमुळेच, रिझव्‍‌र्ह बँक मंगळवारच्या पतधोरणातच व्याजदर वाढवेल, या अंदाजाने सोमवारी भांडवली बाजार तब्बल ४०० हून अधिक अंशांने गडगडला. तर डॉलरच्या तुलनेत ६२ च्या खाली असलेला रुपया सोमवारी ६३ चाही तळ पार करता झाला.

Story img Loader