राजीव घोलकर यांनी प्रश्न विचारला आहे, ए ग्रुप मध्ये नोंदणी असलेल्या कंपनीना काही अटी पाळाव्या लागतात का? http://www.bseindia.com  वर याबाबत सविस्तर माहिती आहे. मागील तीन महिन्यांच्या काळात जितके दिवस एक्सचेंजवर व्यवहार झालेले असतील त्यापकी किमान ९८ टक्के दिवस सदर कंपनीच्या शेअर्सचे व्यवहार झाले असले पाहिजेत, ही एक अट असते. बिगर प्रवर्तकांचा हिस्सा किमान १० टक्के पाहिजे अशीही अट असते. अर्थात ही अट सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना लागू नाही.
आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक जसे ट्रेडिंग अकाउंट उघडतात तसे जनता सहकारी बँक, सारस्वत बँक का उघडत नाही, अशी विचारणा वसईहून अनघा मुळे यानी केली आहे. एक बाब जाणून घ्या – आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक ट्रेडिंग अकाउंट उघडत नाहीत. कारण त्या बँकांच्या ज्या उपकंपन्या ब्रोकिंगच्या व्यवसायात आहेत (ब्रोकर आहेत) त्या ही खाती उघडतात. उदाहरणार्थ आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड,  एचडीएफसी सिक्युरिटीज लिमिटेड वगरे. कुठलीही बँक ट्रेडिंग अकाउंट उघडणार नाही. त्यामुळे जनता सहकारी बँक असो की सारस्वत बँक त्याना याबाबत दोष देता येणार नाही. अरिवद पाटील यांनी विचारले आहे की जनता सहकारी बँकेतील त्यांचे बचत खाते ऑनलाइन ट्रेडिंगसाठी वापरता येईल का? नक्कीच येईल. मात्र त्यासाठी कोणत्याही एका ब्रोकरकडे ट्रेडिंग अकाउंट उघडावे लागेल. जिथे तुमचे बचत खाते आहे त्याच बँकेत डिमॅट खातेही उघडू शकता. आता जेव्हा तुम्हाला शेअर्स विकायचे असतील तेव्हा ब्रोकरच्या कार्यालयात न जाता तुम्ही तुमची सूचना ईमेलद्वारे ब्रोकरला देऊ शकता. किंवा ब्रोकरच्या वेबसाइटवर लॉन इन करून तिथे सूचना देऊ शकता. या दोन्ही बाबी सुरक्षित आहेत. कारण तुमची ऑर्डर (सूचना) कुठेतरी सव्‍‌र्हरवर नोंदली गेली आहे त्यामुळे तोंडोतोंडी व्यवहार नाही. आता प्रश्न राहिला तो डिलिव्हरी इंस्ट्रक्शन स्लिप घेऊन डीपीकडे म्हणजेच जनता सहकारी बँकेत जाण्याचा. तेही कष्ट तुम्हाला घ्यायचे नसतील तर दोन पर्याय आहेत. सीडीएसएलची ईझीएस्ट सेवा वापरून (जी विनामूल्य आहे) तुम्ही इंस्ट्रक्शन स्लिप इंटरनेटद्वारे डेटा एंट्री करून पाठवू शकता. दुसरा पर्याय म्हणजे जो कुणी तुमचा ब्रोकर आहे त्यालाच मुखत्यारपत्र (Power of Attoney) देणे. यामध्ये अधिक सुरक्षितता हवी असेल तर general Power of Attoney न देता Limited purpose द्यावी. याचा अर्थ असा होतो की जितके शेअर्स तुम्ही विकले आहेत तितकेच शेअर्स ब्रोकर तुमच्या डिमॅट खात्यातून वळते करून घेऊ शकतो.  एनएसडीएलमध्ये पण ही सोय आहे. आता प्रश्न म्हणजे ब्रोकरकडून चेक मागून घेणे व तो जनता सहकारी बँकेतील बचत खात्यात जमा करणे. हे देखील तुम्ही टाळू शकता कारण आजकाल सर्व बँका इंटरनेट बँकिंग सुविधा विनामूल्य देतात. जर तुम्ही तुमच्या ब्रोकरला कायमस्वरूपी सूचना देऊन ठेवलीत तर ब्रोकर तुमच्या बचत खात्यात पसे जमा करण्याची व्यवस्था करतो. चेक लिहून तो तुम्हाला देण्यापेक्षा हे करणे त्याला अधिक सोयीचे असते. चेक नाहीच त्यामुळे कागदाची बचत शिवाय क्लिअिरगमधील चेकचा प्रवास पण टळतो!
‘बीटीएसटी’ ही प्रणाली कशी चालते आणि त्यात धोका काय आहे? बीटीएसटी याचा अर्थ Buy Today, Sell Tomorrow असा आहे. म्हणजे सोमवारी खरेदी केलेले शेअर्स तुमच्या खात्यात बुधवारी जमा होणार. ते शेअर्स तुम्ही मंगळवारी विकायची आज्ञा ब्रोकरला दिलीत तर टी+१ म्हणजे बुधवारी तुम्ही तितके शेअर्स ब्रोकरला दिले पाहिजेत. जे शक्य आहे कारण सोमवारी खरेदी केलेले शेअर्स तुमच्या खात्यात बुधवारी येणारच आहेत. हे जरी तत्वत ठीक वाटले तरी त्यात एक धोका आहे. जरी टी+२ हे खरे असले तरी ब्रोकरना सेबीने टी+२ म्हणजेच पे आऊटच्या तारखेपासून एक दिवस  जास्त घ्यायला परवानगी दिली आहे.
तात्पर्य, सोमवारी खरेदी केलेले शेअर्स तुमच्या खात्यात गुरुवारी देखील येऊ शकतात. म्हणजे मग तुम्ही बुधवारी डिलिव्हरी कशी काय देणार? अर्थात त्या शेअर्सचे ऑक्शन होणार व त्याचा भरुदड तुम्हालाच पडणार. हाच तो धोका. मात्र जे शेअर्स तुम्ही बीटीएसटी करणार असाल तितके शेअर्स अगोदरच तुमच्या डिमॅट खात्यात असतील तर मग हरकत नाही कारण तिथून डिलिव्हरी देता येईल.