मोबाइलधारकांना तापदायक ठरलेल्या वाणिज्यिक कारणासाठी केल्या जाणाऱ्या अनाहूत कॉल्स व एसएमएसबाबत दूरसंचार नियामक ‘ट्राय’ने कठोर भूमिका घेत अनेक सेवा प्रदात्यांवर दंडात्मक कारवाईही सुरू केली असली, तरी अशा कॉल्सना पायबंद घालण्याबाबत आणि घालून दिलेल्या दंडकाच्या पालनाबाबत ट्रायने वाणिज्य बँकांना डिसेंबरच्या मध्यापर्यंतची मुभा बहाल केली आहे.
बँकांबरोबरीनेच विमा कंपन्यांनी येत्या चार ते सहा आठवडय़ांत या संबंधाने निश्चित स्वरूपाचा बंदोबस्त करावा, असे आपण कळविले असल्याचे भारतीय दूरसंचार नियामक आयोग (ट्राय)चे अध्यक्ष राहुल खुल्लर यांनी स्पष्ट केले. आजवर ‘नकोशे कॉल्स’च्या तक्रारींबाबत बँका अथवा विमा कंपन्यांवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली गेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. जर दिलेल्या मुदतीपल्याड दंडकाचे पालन न झाल्यास, बँका व विमा कंपन्यांच्या दूरसंचार जोडण्याच कापल्या जाऊ शकतील, असा इशाराही खुल्लर यांनी दिला आहे. सरलेल्या सप्टेंबर महिन्यात अॅक्सिस बँक, सिटी बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्र बँक, पंजाब नॅशनल बँक आणि स्टेट बँक वगैर बँकांना व्यावसायिक वृद्धीसाठी त्यांच्याकडून अनोंदणीकृती टेलीमार्केटिंग कंपन्यांचा वापर होत असल्याबद्दल ‘ट्राय’ने आठवडय़ाच्या आत खुलासा करण्यास सूचित केले होते. तर त्या आधी ऑगस्टमध्ये ग्राहकांना नकोशा कॉल्स व एसएमएसद्वारे सतावण्याच्या तक्रारीपासून बँका, विमा कंपन्या व स्थावर मालमत्ता विकासक कंपन्यांना सतर्क राहण्याचे फर्मान ‘ट्राय’ने बजावले आहे. नव्या नियमानुसार, दूरसंचार जोडणी कापण्याबरोबरच, बिगर नोंदणीकृत टेलीमार्केटिंग नेटवर्कचा वापर करून केल्या जाणाऱ्या तापदायक कॉल्स व एसएमएसबाबत दाखल होणाऱ्या प्रत्येक तक्रारीनुरूप ५,००० रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.
‘नकोशे कॉल्स’ दंडकाबाबत ‘ट्राय’कडून बँकांना डिसेंबपर्यंत मुभा
मोबाइलधारकांना तापदायक ठरलेल्या वाणिज्यिक कारणासाठी केल्या जाणाऱ्या अनाहूत कॉल्स व एसएमएसबाबत दूरसंचार नियामक ‘ट्राय’ने कठोर भूमिका घेत अनेक सेवा प्रदात्यांवर दंडात्मक कारवाईही सुरू केली असली
First published on: 28-11-2013 at 12:06 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trai to banks check pesky calls sms before mid december