अमेरिकेच्या स्थावर मालमत्ता क्षेत्राचे सम्राट आणि सौंदर्यस्पर्धाचे आयोजन ते टीव्हीवरील वावराने वलयांकित प्रतिमा लाभलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट विदेशी गुंतवणुकीबाबतचे नियम कठोर असले तरी भारताबद्दल आपल्या खूपच आशा असल्याचे मंगळवारी मुंबईभेटीत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
अमेरिकेतील मॅनहॅटन इलाख्यात क्षितिज झाकोळणाऱ्या गगनचुंबी इमारतींचे विकासक असलेले ट्रम्प यांनी लोढा समूहासह भागीदारीने साकारलेल्या वरळी येथील ८०० फूट उंच आणि ७७ मजल्यांच्या ‘ट्रम्प टॉवर’ या निवासी मनोऱ्याचे अनावरण केले. त्यांची गुंतवणूकदार कंपनी ट्रम्प ऑर्गनायझेशनने भागीदारीत उभारलेला हा दुसरा ट्रम्प मनोरा आहे.
लोकसभेच्या निवडणुकांनंतर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारमुळे भारतातील गुंतवणुकीचा मानस कमालीचा बदलला असून आपणही येत्या काळात व्यक्तिगत क्षमतेत जास्तीतजास्त गुंतवणूक येथे करणार आहोत, असे त्यांनी नेमक्या गुंतवणुकीचे प्रमाण स्पष्ट न करता सांगितले. ‘आजच्या घडीला जगातील सर्वात स्वस्त ऐशआरामी मालमत्तांची बाजारपेठ’ असे भारताचे वर्णन करीत येत्या काळात ऐशआरामी निवासी तसेच हॉटेल्स मालमत्तांमध्ये गुंतवणुकीसाठी सुयोग्य भागीदारांच्या आपण शोधात असल्याचे त्यांनी नि:संदिग्धपणे सांगितले.
आगामी गुंतवणुकीसाठी दिल्लीतील उच्च श्रेणीतील आलिशान निवासी क्षेत्रावर आपले लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा