सर्वाधिक मागणी असलेल्या मध्यम मिळकत असलेल्या वर्गासाठी पूर्वाकरा प्रोजेक्ट्स लिमिटेडने संपूर्ण मालकीची उपकंपनी ‘प्रॉव्हिडंट हाऊसिंग लिमिटेड’मार्फत देशस्तरावर विविध १२ शहरांमध्ये परवडण्याजोग्या किमतीत घरे बांधण्याची योजना गुरुवारी येथे जाहीर केली. प्रतिस्पर्धी बांधकाम कंपन्यांच्या तुलनेत २०-२५ टक्के कमी किमतीच्या घरांच्या बंगळुरूमध्ये यशस्वी झालेल्या प्रयोगाचे अनुसरण मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्येही करण्याचे कंपनीचे नियोजन आहे.
परवडणाऱ्या किमतीतील घरांच्या बाजारपेठेत ‘प्रॉव्हिडंट’ हे ब्रॅण्ड या आधीच सिद्ध झाले आहे. किंबहुना आजच्या घडीला मध्यम मिळकत असलेल्या उत्पन्नगटासाठी कुणीही ब्रॅण्डेड स्पर्धक उपलब्धच नसल्याचे पूर्वाकरा प्रोजेक्ट्सचे सह-व्यवस्थापकीय संचालक आशीष पूर्वाकरा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आपल्या चेन्नई-बंगळुरूमधील प्रकल्पांची यशस्विता पाहता, हाच प्रयोग लवकरच मुंबई-पुण्यातही साकारण्याची योजना असून, या शहरांमध्ये सिंगल व डबल बेडरूमचे प्रीमियम पण परवडणारी घरे ३५ लाख रुपयांच्या श्रेणीत देणे शक्य असल्याचा त्यांनी दावा केला.
किमतीच्या दृष्टीने किफायती ठरेल अशी व्हॅल्यू इंजिनीयरिंग प्रक्रिया वापरात आणत ‘प्रॉव्हिडंट’ या ब्रॅण्ड अंतर्गत पूर्वाकरा प्रोजेक्ट्सने बंगळुरूमध्ये २००८ पासून आजवर ४००० हून अधिक टू-बीएचके आणि तीन-बीएचके सदनिका अनुक्रमे २९.७५ लाख रुपये आणि ३५.९६ लाख रुपये अशा सर्वसमावेशक किमतीला विकल्या आहेत. बंगळुरूमधील वेलवर्थ सिटी आणि हार्मनी तसेच चेन्नईतील कॉस्मो सिटी हे प्रकल्प म्हणजे सर्वोत्तम राहणीमान असा आज लौकिक झाला आहे. कारण निगा राखलेल्या बागा, खेळाची मैदाने, स्विमिंग पूल, जिम्नॅशियम, सुपर मार्केट, बहुविध क्लब हाऊसेस अशा सोयी-सुविधांनी सज्ज प्रॉव्हिडंटच्या वसाहती या ‘परवडणारी प्रीमियम घरे’ अशा श्रेणीत मोडणारी ठरली आहेत, असे प्रॉव्हिडंट हाऊसिंग लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. मधू यांनी सांगितले.
या समूहाचा बंगळुरूमध्ये ‘प्रॉव्हिडंट सनवर्थ’ नावाचा ६० एकर जमिनीवरील नवीन भव्य गृहप्रकल्प लवकरच विक्रीसाठी दाखल होत असून, नजीकच्या भविष्यात मंगळुरू, कोइम्बतूर, हैदराबाद, म्हैसूर, चेन्नईव्यतिरिक्त, मुंबई, पुणे, अहमदाबाद, बडोदा, नागपूर, जयपूर या शहरात विस्ताराच्या योजना असल्याचे मधू यांनी सांगितले.
‘मुंबईतही ३५ लाखांच्या श्रेणीत टू-बीएचके घर देणे शक्य: पूर्वाकरा
सर्वाधिक मागणी असलेल्या मध्यम मिळकत असलेल्या वर्गासाठी पूर्वाकरा प्रोजेक्ट्स लिमिटेडने संपूर्ण मालकीची उपकंपनी ‘प्रॉव्हिडंट हाऊसिंग लिमिटेड’मार्फत देशस्तरावर विविध १२ शहरांमध्ये परवडण्याजोग्या किमतीत घरे बांधण्याची योजना गुरुवारी येथे जाहीर केली.
First published on: 14-12-2012 at 04:27 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two bhk home can be possible in 35 lacs scale in mumbai purvakara