रत्नागिरी जिल्ह्यात पाच शाखा असलेल्या स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने आर्थिक वर्षांच्या सांगतेला म्हणजे ३१ मार्च रोजी सरलेल्या वर्षांचा आर्थिक ताळेबंद जाहीर करण्याच्या परंपरेला अनुसरून, यंदाही उमदी प्रगती दर्शविणारी वर्ष २०१२-१३ची कामगिरी जाहीर केली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत संस्थेच्या नफ्यात ३५.४८ टक्क्यांची वाढ होऊन, तो रु. २ कोटी १ लाख रुपये झाला आहे. आर्थिक वर्षांत संस्थेचे खेळते भांडवलही ३८.२२ टक्के वाढून ७१ कोटी ३९ लाख झाले असून, नफ्याचे खेळत्या भांडवलाशी प्रमाण २.८१ टक्के असे लक्षणीय आहे.
उल्लेखनीय म्हणजे देशभरात वाणिज्य बँकांच्या कर्जवितरणाला ओहोटी लागली असताना, संस्थेने गतवर्षांच्या तुलनेत ४४.८० टक्के अधिक म्हणजे ६८.२२ लाखांचे कर्ज वितरण केले. तर सलग नवव्या वर्षी संस्थेच्या सर्व शाखांनी १०० टक्के कर्जवसुलीही साध्य केली. संस्थेच्या  ठेवींमध्ये ४३.९१टक्के अशी     विक्रमी वाढ होऊन त्या ६१.६६ कोटींवर गेल्या आहेत.
या दमदार कामगिरीतील अधिकारी, पिग्मी एजंट, कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान ओळखून संस्थेने त्यांच्या वेतनात भरघोस वाढ एप्रिल २०१३ पासून लागू केली आहे, या वेतनवाढीचा एकत्रित खर्च वार्षिक ६२ लाखांचा घरात जाणारा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two crores profit to swami swaroopanand credit society