सार्वजनिक क्षेत्रातील कोलकातास्थित युनायटेड बँक ऑफ इंडिया (यूबीआय)ने गेली दोन वर्षे बंद अवस्थेत असलेल्या या विमान कंपनीचे अध्यक्ष मद्यसम्राट विजय मल्या आणि कंपनीच्या अन्य संचालकांवर, निर्ढावलेले थकबाकीदार म्हणजे बँकिंग परिभाषेत ‘विलफुल डिफॉल्टर’ ठरविणारी प्रक्रिया पूर्ण केली. विविध बँकांचे तब्बल ४,०२२ कोटींचे कर्ज किंगफिशर एअरलाइन्सने थकविले असले, तरी अशा तऱ्हेची कारवाई करणारी यूबीआय ही पहिलीच बँक आहे.
यूबीआयचे कार्यकारी संचालक दीपक नारंग यांनी, ‘विजय मल्या आणि किंगफिशर एअरलाइन्सच्या अन्य तीन संचालकांना ‘विलफुल डिफॉल्टर्स’ म्हणून घोषित केले आहे,’ असे पीटीआयला सांगितले. या संचालकांमध्ये रवी नेदुन्गाडी, अनिल कुमार गांगुली आणि सुभाष गुप्ते यांचा समावेश आहे. किंगफिशर एअरलाइन्सने यूबीआयचे ३५० कोटी रुपयांचे कर्ज थकविले आहे.
बँकेच्या गाऱ्हाणे निवारण समितीने घेतलेला हा निर्णय अर्थ मंत्रालय, रिझव्र्ह बँक आणि सेबीला योग्य ती दखल घेऊन कृती करण्यासाठी कळविला जाईल, असेही नारंग यांनी स्पष्ट केले. बँकेने किंगफिशर एअरलाइन्स या संबंधाने धाडलेल्या नोटिशीला कोलकाता उच्च न्यायालयात कंपनीने आव्हान दिले होते. मात्र न्यायालयाच्या खंडपीठाने ते रद्दबातल ठरवून बँकेला मल्या आणि अन्य संचालकांना ‘विलफुल डिफॉल्टर्स’ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची मंजुरी गेल्या आठवडय़ात दिली.
बँकेच्या गाऱ्हाणे निवारण समितीने या दरम्यान किंगफिशरच्या संचालकांना त्यांच्यापुढे जातीने उपस्थित राहण्यास कळविले. संचालकांपैकी कोणीही आले नाही, उलट कंपनीकडून सर्वोच्च न्यायालयात या संबंधाने जनहित याचिका दाखल केली जाणार आहे आणि तिचा निकाल येईपर्यंत बँकेने कारवाई रोखून धरावी, असे सुचविणारे कंपनीच्या वकिलाकडून पत्र सादर करण्यात आले.
विविध १७ हून अधिक बँकांचे कर्ज थकविणाऱ्या विजय मल्ल्या यांना ‘विलफुल डिफॉल्टर’ म्हणजेच निर्ढावलेले कर्जबुडवे जाहीर करण्याची तयारी सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक, आयडीबीआय बँक आणि पंजाब नॅशनल बँकेनीही सुरू केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा