नव्या व्यवस्थापनाने केलेल्या गैरव्यवहाराच्या पाश्र्वभूमीवर यूनायटेड स्पिरिट्सला कंपनी व्यवहार खाते व प्राप्तीकर विभागाने नोटीस बजावली आहे. पूर्व प्रवर्तक विजय मल्ल्या यांच्या कंपन्यांना दिलेल्या कर्जाच्या चौकशीसह कंपनीच्या ताळेबंदाची चाचपणी आदेशही याद्वारे देण्यात आले आहेत.
मद्यसम्राट मल्ल्या यांच्या यूनायटेड स्पिरिट्सवर ब्रिटनच्या दियाज्जिओने दोन वर्षांपूर्वी ताबा घेतल्यानंतर याबाबतच्या खरेदी व्यवहारातील गैरव्यवहारांसह मल्ल्या यांच्या अन्य कंपन्यांना गैर मार्गाने कर्ज दिल्याचा ठपका अंतर्गत चौकशीत ठेवला होता. याबाबत मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराने विचारणा केल्यानंतर यूनायटेड स्पिरिट्सद्वारे त्याला नकारही देण्यात आला होता.
आता थेट कंपनी व्यवहार खाते व त्याचबरोबर प्राप्तीकर विभागानेही कंपनीला नोटीस पाठविली आहे. त्यात कंपनीच्या ताळेबंदाची चौकशी करण्यास मल्ल्या यांच्या कंपन्यांना दिले गेलेल्या कर्जाचीही चाचपणी करण्यात येणार आहे. कंपनीनेही तिचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद कृपालू यांनाही पुढील चौकशी करण्यास सांगितले आहे.
कंपनी व्यवहार खात्याने कंपनीला नोटीस पाठविली आहे. तर प्राप्तिकर विभागाने प्राप्तिकर कायदा १९६१ च्या कलम १३१ अन्वये विचारणेचे पत्र पाठविले आहे. यूनायटेड स्पिरिट्सदेखील त्याला योग्य प्रतिसाद देईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
सप्टेंबर २०१४ मध्ये दिआज्जिओने ३ अब्ज डॉलरद्वारे यूनायटेड स्पिरिट्सवर ५५ टक्के हिस्सा खरेदीसह मालकी प्रस्थापित केल्यानंतर खरेदी व्यवहारात फसवणूक झाल्याचा आरोप केला होता. यानंतर कंपनीने अंतर्गत केलेल्या चौकशीतही हिच बाब समोर आल्याचे गेल्या महिन्यात स्पष्ट केले होते. मल्ल्या यांना कंपनीच्या संचालक मंडळावरून दूर होण्यास सांगण्यासह मल्ल्या यांच्या किंगफिशर तसेच अन्य कंपन्यांना (१,३३७ कोटी रुपयांपर्यंतचे) कर्ज (२०१० ते २०१३ दरम्यान) गैर मार्गाने दिल्याचा ठपका नव्या व्यवस्थापनाने ठेवला होता. यावर मल्ल्या यांनी कंपनीच्या संचालक मंडळावरून नाहीसे होण्यास नकार दिला होता. दरम्यान, भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या यूनायटेड स्पिरिट्सने वाढत्या कर्जापोटी बुधवारी गेल्या तिमाहीत १,८०० कोटी रुपयांचा तोटा नोंदविल्याचे जाहीर केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा