वर्षभरापासून जमिनीवरील विसावलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचे सर्वेसर्वा विजय मल्या यांच्या अखत्यारितील युनायटेड ब्रीव्हरिज (यूबी) समूहातील विविध कंपन्यांना देण्यात आलेल्या कर्जाची चौकशी करण्याचे आदेश समूहातीलच युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड या कंपनीवर नव्याने ताबा मिळविलेल्या डिआज्जिओच्या संचालक मंडळाने गुरुवारी सायंकाळी उशिराने दिले.
 युनायटेड बँक ऑफ इंडियाकडून ‘विलफुल डिफॉल्टर’ अर्थात कर्जबुडवे म्हणून जाहीर झाल्याने मल्या यांच्या चिंता वाढल्या असताना, आता  डिआज्जिओने मल्या यांच्या कार्यकाळात वितरीत कर्जाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
युनायटेड स्पिरिट्सने मार्चअखेर ४,४८८.७७ कोटी रुपयांचा तोटा नोंदविला आहे. वर्षभरापूर्वी कंपनीचा तोटा १०५.०३ कोटी रुपये होता. कंपनीने मार्च २०१४ अखेरसाठी कर्जफेडीसाठीची म्हणून १,०१२.७५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. समूहातील अन्य कंपन्यांना युनायटेड स्पिरिट्सने दिलेली या कर्जाची संशयित कर्जे म्हणून संभावना करताना संचालक मंडळाने हे पाऊल उचलले आहे.
विजय मल्या प्रवर्तक असलेल्या यूबी समूहातील कंपन्यांना युनायटेड स्पिरिटने दिलेले कर्ज हे संशयित असल्याचा ठपका ठेवत कंपनीवर नव्याने आलेल्या व्यवस्थापकीय संचालकांनी स्वतंत्र सल्लागार तसेच काही तज्ज्ञांच्या मदतीने याबाबतच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
‘निर्ढावलेले कर्जबुडवे’ म्हणून बँकांकडून जाहीर लांच्छन आलेल्या विजय मल्या यांच्या मालकीच्या युनायटेड स्पिरिट्सच्या ५३.४० टक्क्यांच्या भागभांडवलावर डिआज्जिओने मालकी मिळविली आहे. मूळच्या ब्रिटनच्या डिआज्जिओमार्फत युनायटेड स्पिरिट्समार्फत तिची उपकंपनी व्हाईट अ‍ॅण्ड मॅके व्हिस्कीच्या विक्री व्यवहाराचीही चौकशी करण्यात येणार आहे.
डिआज्जिओने युनायटेड स्पिरिट्समध्ये जुलै २०१३ मध्ये २५.०२ टक्के हिस्सा खरेदी केला तेव्हापासूनच कंपनीवर आपले वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आहे. कंपनीचे सर्व आर्थिक व्यवहार नजरेखालून घालताना संचालक मंडळावरही कडक र्निबध लादले आहेत. जुलै २०१४ मध्ये अतिरिक्त २६ टक्के हिस्सा १.११ अब्ज पौंडांना खरेदी केल्यानंतर तर युनायटेड स्पिरिट्सवरील डिआज्जिओचा अंकुश अधिक वाढला आहे.
आयडीबीआय बँकेनेही ठरविले
– कर्जबुडवे –
किंगफिशर एअरलाइन्सचे विजय मल्या यांना आणखी एका सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने विलफुल डिफॉल्टर- निर्ढावलेले कर्जबुडवे जाहीर केले आहे. आयडीबीआय बँकेकडून मल्या यांच्याबरोबर गेल्या वर्षभरापासून जमिनीवर खिळलेल्या किंगफिशर एअरलाइन्स या कंपनीलाही कर्जबुडवे घोषित करण्यात आले आहे. यापूर्वी सार्वजनिक क्षेत्रातीला युनायटेड बँक ऑफ इंडियाने मल्या यांच्यावर हा शिक्का मारला होता. कर्ज न फेडल्याबद्दल कारवाईसाठी हा शिक्का मारला गेल्याने मल्या व त्यांच्या कंपन्यांना बँकांकडून नव्याने अर्थसहाय्य मिळविणे अवघड जाईल. आयडीबीआय बँकेने किंगफिशरच्या व्यवस्थापनाला गेल्याच आठवडय़ात पत्र लिहून मल्या यांनाही शुक्रवारच्या बैठकीसाठी बोलाविले होते. मात्र ते न आल्याने अखेर बँकेने मल्या यांना कर्जबुडवे म्हणून जाहीर केले. दरम्यान, या कारवाईला उत्तर देण्याची तयारी किंगफिशरने सुरू केली असून रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियमानुसार अशी कारवाई गैर असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा