* उद्योगधंद्यांचा विकासदर पुन्हा उणे ०.६%
* सरकारी हस्तक्षेपाची उद्योगांकडून अपेक्षा
सलग दुसऱ्या महिन्यात देशातील औद्योगिक उत्पादनाचा दर शूल्याखाली नोंदविला गेला. देशाच्या अर्थव्यवस्थेचे गमक मानला जाणारा हा विकासदर डिसेंबर २०१२ मध्ये मागील वर्षांतील या कालावधीच्या तुलनेत उणे ०.६ टक्के राहिला आहे. यापूर्वीच्या महिन्यातही हा दर उणे ०.८ टक्केच होता.
सप्टेंबर २०१२ मधील ०.७ टक्क्याच्या कारखानदारीतील विकासदरानंतर ऑक्टोबर २०१२ मध्ये औद्योगिक उत्पादन दर ८.३ टक्क्यापर्यंत उंचावला होता. यंदा मात्र तो पुन्हा शून्याखाली विसावला आहे. वर्षभरापूर्वी डिसेंबर २०११ मध्येही हा दर २.७ टक्के होता.
औद्योगिक उत्पादन दरांमध्ये सर्वाधिक हिस्सा राखणाऱ्या निर्मिती क्षेत्रानेही ०.७ टक्के घसरण नोंदविली आहे. वर्षभरापूर्वी या क्षेत्राची वाढ २.८ टक्के होती. या क्षेत्राने एप्रिल ते डिसेंबर २०१२ मध्येही ०.७ टक्केच प्रमाण राखले आहे.
घसरत्या औद्योगिक उत्पादन दराबद्दल चिंता व्यक्त करत उद्योगांनी आता अपेक्षित निर्णयांसाठी रिझव्‍‌र्ह बँक (आणखी व्याजदर कपात करून) तसेच नव्याने स्थापण्यात आलेल्या गुंतवणूक विषयावरील मंत्रिमंडळ समितीचे अध्यक्ष खुद्द पंतप्रधान डॉ. सिंग (प्रकल्पांची मंजुरी सुरळीत करून) यासारख्या थेट सरकारी हस्तक्षेपाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
चालू आर्थिक वर्षांतील एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्याच्या कालावधीत देशातील औद्योगिक निर्मिती वर्षभरापूर्वीच्या ३.७ टक्क्यांच्या तुलनेतही यंदा ०.७ टक्केच राहिली आहे.
डिसेंबरमधील औद्योगिक उत्पादनवाढीचे हे आकडे जाहीर करणाऱ्या केंद्रीय सांख्यिकी संघटनेने नुकताच देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेगही सरकारच्या ५.७ ते ५.९ टक्के अंदाजापेक्षा कमी, अवघा ५ टक्के अंदाजला आहे. याबद्दल खुद्द केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही मुंबई दौऱ्यादरम्यान नाराजी व्यक्त करीत मार्च २०१३ अखेर ५.५ टक्के आर्थिक विकासदराचा विश्वास नोंदविला होता.
प्रमुख उद्योग संघटनांच्या प्रतिक्रिया
यंदा खनिकर्म क्षेत्राची वाढ चिंताजनक आहे. याचा फटका कोळसा आणि इतर औद्योगिक उत्पादनांवर होण्याची भीती आहे. तेव्हा समस्येत भर घालणारे कोणतेही नवे कर या उद्योगांवर लादले जाऊ नयेत, एवढीच अपेक्षा आहे.
*  सीआयआय
भांडवली वस्तूसारख्या पायाभूत निर्मिती क्षेत्राची वाढ सातत्याने घसरत आहे. यातून आर्थिक सुधारणांची प्रथम आबाळ आणि आता अंमलबजावणी फारच ताणल्याचेच यातून प्रतीत होत आहे.
*  अ‍ॅसोचेम
औद्योगिक उत्पादनवाढीचे नकारात्मक आकडे निश्चितच चिंताजनक आहेत. ग्राहकोपयोगी वस्तू आणि गुंतवणूक या क्षेत्राने यंदा नकारात्मक वाढ नोंदविली आहे. सरकारने आता याबाबत गांभीर्याने लक्ष घालण्याची नितांत गरज आहे.
* फिक्की

Story img Loader