सहकार्याचे संकेत देत अमेरिकी काँग्रेस सदस्यांनी दोन वर्षांचा अर्थसंकल्प तयार करण्यास तत्त्वत: मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे आता अमेरिकेची आर्थिक तूट २३ अब्ज डॉलरने कमी होईल तसेच अलिकडे जी ‘शटडाऊन’ची नामुष्की एवढय़ा मोठय़ा देशाच्या अर्थव्यवस्थेवर आली तशी पुन्हा येणार नाही.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी अर्थसंकल्पविषयक या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘जर तो निर्णय अमेरिकी काँग्रेसने मंजूर केला तर त्यामुळे पुढील दोन वर्षे शटडाऊनची नामुष्की येणार नाही, आज द्विपक्षीय अर्थसंकल्प करार झाला ते एक चांगले पाऊल आहे.’ असे ओबामा यांनी रिपब्लिकन व डेमोक्रॅटिक सदस्यांमधील वाटाघाटीनंतर सांगितले.
ते म्हणाले की, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, मध्यमवर्गीय कुटुंबे यांना ज्या सरसकट कपातीच्या तरतुदीमुळे त्रास सहन करावा लागला व लोकांची आर्थिक फरपट झाली, त्याच्या जागी हा करार अमलात येईल. अर्थसंकल्पाबाबत झालेल्या कराराची घोषणा करताना अमेरिकी काँग्रेसचे सदल्य पॉल रायन यांनी सांगितले की, यामुळे आर्थिक तूट २३ अब्ज डॉलर होईल. जैसे थे परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी हा करार उपयोगी असून त्यामुळे पुढील जानेवारीत गेल्या ऑक्टोबरसारख्या शटडाऊनची वेळ येणार नाही.

Story img Loader