माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी पूर्वाश्रमीच्या सत्यम कॉम्प्युटर्समधील घोटाळ्याचे त्या कंपनीचे संचालकही बळी ठरले असल्याचे कारण पुढे करीत अमेरिकी न्यायालयाने कंपनीच्या सात संचालकांविरुद्धचा दावा फेटाळून लावला. कंपनीमध्ये झालेल्या घोटाळ्याचा प्रत्यक्ष फायदा संचालकांना झाल्याचे पुरावे देण्यात याचिकाकर्त्यांना अपयश आल्याचे सांगत येथील जिल्हा न्यायाधीश बार्बरा जोन्स यांनी ही याचिका फेटाळून लावली.
जानेवारी २००४ ते जानेवारी २००९ या काळात सत्यम कॉम्प्युटर्सचे समभाग खरेदी करणाऱ्या अमेरिकी गुंतवणूकदार कंपन्यांनी याबाबतची याचिका दाखल केली होती. यामध्ये हॉवर्ड बिझनेझ स्कूलचे वरिष्ठ प्राध्यापक कृष्णा पालेप्पू, इंडियन बिझनेस स्कूलचे एम. राममोहन राव, माजी संरक्षण व कॅबिनेट सचिव टी.आर. प्रसाद आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचे माजी संचालक व्ही.एस. राजू यांच्यासह सात माजी संचालकांविरुद्ध ही याचिका दाखल करण्यात आली होती.
हे सर्व जण सत्यमचे माजी संचालक तसेच लेखापरीक्षण समितीचे सदस्यही होते. कंपनीचे वार्षिक ताळेबंद, कंपनीचा ढासळता कारभार, कंपनीने द्यावयाची नुकसानभरपाई आणि अंतर्गत नियंत्रणातील दोष यास हे सर्व जण जबाबदार आहेत, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता.
मात्र जोन्स यांनी आपल्या ७१ पानी निकालपत्रात ही याचिका फेटाळून लावली. भारतीय संगणकविश्वातील दिग्गज कंपनी म्हणून ओळखण्यात येणाऱ्या सत्यम कंपनीचे व्यवसायिक करार आणि बॅँक खाती बनावट असल्याची कबुली सत्यमचे संस्थापक रामलिंगा राजू यांनी जानेवारी २००९ मध्ये दिली होती, त्यानंतरअडचणीत सापडलेल्या या कंपनीला ‘टेक महिंद्रा’ या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने संपादित केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा