सरकारी यंत्रणेचा लाभ घेण्याचे अर्थमंत्र्यांचे आवाहन; बुधवारपासून यंत्रणा
काळा पैसा जाहीर करणाऱ्या केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेल्या यंत्रणेचा उपयोग घेऊन करदात्यांनी निश्चिंत रहावे, असा सल्ला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी येथे दिला. काळा पैसा राखणाऱ्यांना या यंत्रणेचा लाभ न घेतल्यास त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे नमूद करतानाच सुखाची झोप घ्यायची असेल तर संपत्ती जाहीर करा, असेही जेटली यांनी सांगितले.
सध्या जपान दौऱ्यावर असलेल्या जेटली यांनी येत्या बुधवारपासून उपलब्ध होत असलेल्या काळ्या पैशाचा स्त्रोत जाहीर करणाऱ्या यंत्रणेचा उल्लेख केला. या सुविधेचा लाभ जे घेणार नाही त्यांना भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा देतानाच ‘तुम्हाला सुखाची झोप हवी असेल, तर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असलेल्या उत्पन्नस्त्रोत जाहीर करणाऱ्या यंत्रणेचा उपयोग घ्या’ असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.आतापर्यंत ज्यांनी त्यांच्याकडील स्त्रोत नसलेल्या उत्पन्नाबद्दल काहीही जाहीर केलेले नाही त्यांनी आता हे सारे करत, कर भरत शांत झोप घ्यावी, असा सल्ला जेटली यांनी वृत्तसंस्थच्या मुलाखतीत दिला. असे न झाल्यास त्यांची संपत्ती जगजाहीर झाल्यास अधिक संकट उभे राहू शकेल, असेही ते म्हणाले. गाजलेल्या पनामा पेपर्समध्ये नावे असलेल्यांनी तसेच इतरांनीही संपत्ती जाहीर करण्याऱ्या या स्वतंत्र खिडकीचा लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले.
काय आहे मार्ग?
केंद्र सरकारची संपत्ती जाहीर करणारी ही विशेष योजना बुधवार, १ जून २०१६ पासून सुरू होत असून याअंतर्गत येत्या चार महिन्यात काळा पैसा राखणाऱ्यांना त्यांचा स्त्रोत व रक्कम जाहीर करता येईल. त्याचबरोबरच त्यांना लागू करही भरावा लागणार असून ४५ टक्के दंड जमा करावा लागणार आहे. गेल्या वर्षांत सरकारने त्यांच्या अर्थसंकल्पात याबाबत सर्वप्रथम तरतूद केली होती. ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत संपत्ती जाहीर करून पुढील दोन महिन्यात कर आणि दंड भरण्याची मुभा स्त्रोत नसलेल्यांना देण्यात आली आहे. ऑनलाईनच्या माध्यमातूनही हे करता येणार आहे.
राजन घरवापसी : मुद्यावर चर्चा व्हावी – जेटली
सहा दिवसांच्या जपान दौऱ्यावर असलेल्या जेटली यांना रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्या नियुक्तीबद्दल वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीने विचारले असता, कोणत्याही मुद्यावर चर्चा होऊ शकते; मात्र व्यक्तीवर ती होऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण दिले. राजन यांच्या सप्टेंबरनंतरच्या मुदतवाढीबद्दल मात्र ते काहीही बोलले नाही. रिझव्‍‌र्ह बँक आणि पदाधिकारी म्हणून तिचा गव्हर्नर हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे असून त्याबाबत कोणतेही भाष्य करणे उचित ठरणार नाही, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. रिझव्‍‌र्ह बँकेसारख्या कोणत्याही संस्थेबद्दल मतैक्य अथवा मतभेद होणे साहजिक आहे; मात्र त्याचे रुपांतर हे व्यक्तीवरील चर्चेत होता कामा नये, असेही ते म्हणाले. कोणत्याही संस्था, मुद्यावर चर्चा होणे अपेक्षित आहे; मात्र व्यक्तीनिहाय मत प्रदर्शित करणे योग्य होणार नाही, असेही ते म्हणाले. सत्ताधारी भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने राजन यांना पुन्हा विदेशात प्राध्यापकीसाठी पाठवावे, अशी मागणी खुद्द पंतप्रधानांना पत्र लिहून केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा