देशातील आघाडीची ‘डायरेक्ट टू होम (डीटीएच)’ टीव्ही प्रसारण सेवा असलेल्या ‘डिश टीव्ही’ने आगामी काळात अधिकाधिक हाय-डेफिनिशन वाहिन्यांचा आपल्या सेवेत समावेश करून, सर्वाधिक एचडी वाहिन्या असलेली सेवा बनण्याचा संकल्प सोडला आहे. अभिनेता शाहरूख खानसह कंपनीने ‘मॅक्झिमम ट्रू एचडी चॅनल्स’ नावाने विशेष जाहिरात मोहिम याला अनुषंगून सुरू केली आहे. डिश टीव्हीने अलीकडेच पाच नवीन एचडी वाहिन्या आपल्या सेवेत समाविष्ट केल्या आहेत. यातून एकूण २५ एचडी वाहिन्या आणि १७ एचडी सेवा प्रदान करणारी ही सर्वात मोठा एचडी मंच बनला असल्याचा डिश टीव्हीचा दावा आहे. सुस्पष्ट चित्र, संगीत प्रसारणाचा आनंद देणाऱ्या ‘डिश ट्रू एचडी+’ सेवेसाठी अधिकाधिक ग्राहक मिळविण्याच्या कंपनीच्या प्रयत्नाला आता शाहरूख नव्या जाहिरात मोहिमेने बळ मिळणार आहे. डिश टीव्हीने सरलेल्या जानेवारी-मार्च तिमाहीत अवघ्या दोन लाख नवीन ग्राहकांची नोंदणी केली जी गेल्या सहा वर्षांतील सर्वात कमी तिमाही वाढ आहे. दोन तिमाहीआधी करण्यात आलेली दरवाढ हे यामागे कारण असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
फिनोलेक्सचा नागपूरमध्ये नवीन उत्पादन प्रकल्प
पीव्हीसी पाइप्सच्या निर्मितीतील अग्रेसर कंपनी फिनोलेक्स इंडस्ट्रीजने या उत्पादनाची वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात नागपूर अथवा उत्तर भारतात नवीन प्रकल्प थाटण्याची योजना बनविली आहे. कंपनीचे सध्या पुणे, रत्नागिरी आणि गुजरातमधील मासार येथे उत्पादन प्रकल्प आहेत. कृषी क्षेत्राच्या विकासावर, पाणी योजनांवर सरकार सध्या मोठय़ा प्रमाणावर खर्च करीत आहे. यासाठी मोठय़ा योजनाही आखल्या जात आहेत याचा फायदा पाइप उद्योगाला नक्कीच होणार असून, मागणीतील ही वाढ लक्षात घेऊन नवीन उत्पादन प्रकल्पाचा विचार फिनोलेक्स इंडस्ट्रीजकडून सुरू असल्याचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ धानोरकर यांनी सांगितले. संघटित क्षेत्राच्या पीव्हीसी पाइप उद्योगात २५ टक्क्याहून अधिक बाजारहिस्सा असलेल्या फिनोलेक्ससाठी भौगोलिकदृष्टय़ा व वाहतूकदृष्टय़ा सोयीच्या उत्तर भारतात विस्ताराचे नियोजन महत्त्वाचे असले तरी नागपूरमध्ये योग्य अशी जागा शोधण्याला आधी प्राधान्य दिले जाईल, असेही धानोरकर यांनी स्पष्ट केले.  फिनोलेक्सची पीव्हीसी आणि रेझिन पाइप्सची सध्याची उत्पादन क्षमता २ लाख ७० हजार मेट्रिक टन आहे. तर देशांतर्गत या पाइप्सच्या बाजारपेठेचा आकार हा जवळपास १५ लाख मेट्रिक टन असून, निम्मा पुरवठा हा असंघटित क्षेत्रातील उत्पादकांकडून होतो.
सिंडिकेट बँकेत सामायिक ग्राहक संपर्क बैठका
सार्वजनिक क्षेत्रातील सिंडिकेट बँकेने गुरुवारी, २३ मे रोजी देशभरातील आपल्या सर्व शाखांमध्ये सामायिक ग्राहक संपर्क बैठकांचे आयोजन केले होते. बँकेच्या प्रभादेवी शाखेत आयोजिण्यात आलेल्या अशा सभेचे अध्यक्षपद बँकेच्या मुंबई विभागाचे महाव्यवस्थापक एम. के. जैन यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून आयडीबीआयचे माजी कार्यकारी संचालक राधेश्याम अगरवाल हे उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत बँकेच्या विद्यमान वित्तीय कामगिरीची उपस्थित ग्राहकांना माहिती देण्याबरोबरच बँकेच्या विविध ग्राहकोपयोगी सेवा-सुविधा, निधी हस्तांतरण करण्यासाठी वापरण्यात येणारे अद्ययावत तंत्रज्ञान आणि सर्वसामान्य ग्राहकांनादेखील सोयीची ठरतील अशी बँकेची ऋण उत्पादने याविषयी माहिती देण्यात आली. प्रभादेवी शाखेचे मुख्य व्यवस्थापक श्रीनिवास यांनी या सभेच्या आयोजनात पुढाकार घेतला.