नवी दिल्ली : बेंगळूरुस्थित तंत्रज्ञानाधारित शिक्षण मंच ‘वेदांतू’कडून बुधवारी ४२४ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. कंपनीच्या एकूण ५९०० कर्मचाऱ्यांपैकी ४२४ कर्मचारी म्हणजे ७ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय सोपा नव्हता, असे वेदांतूचे मुख्याधिकारी व सह-संस्थापक वामसी कृष्णा यांनी स्पष्ट केले.

कंपनीकडून नफा वाढीसाठी प्रयत्न केले जात असून, त्या संबंधाने धोरणात्मक उपाययोजना आणि खर्चात कपातीवर लक्ष केंद्रित केले जात आहे. शिवाय करोना र्निबध संपुष्टात येऊन शाळा-महाविद्यालयांचे वर्ग सुरू झाल्याने ऑनलाइन शिक्षण घेण्याचा कल कमी झाल्याने एकंदरीत तंत्रज्ञानाधारित शिक्षण मंचांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. वेदांतूने पंधरवडय़ापूर्वी २०० हून अधिक कंत्राटी, पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना कमी केले होते. वेदांतूच्या चांगल्या भविष्यासाठी हा निर्णय घ्यावा लागल्याचे कृष्णा यांनी समाजमाध्यमावरील टिपणांतून स्पष्ट केले.  बाजारात टिकून राहणे कंपनीसाठी दिवसेंदिवस आव्हानात्मक बनत आहे. जागतिक मंदीसदृश परिस्थितीमुळे नवउद्यमींना व्यवसाय करण्यासाठी आव्हानांचा सामना करावा लागत आहे. वाढत्या महागाईमुळे आगामी तिमाहीमध्ये भांडवल कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे, असेही कृष्णा म्हणाले.

Story img Loader