रिझव्‍‌र्ह बँकेने काल जाहीर केलेल्या पतधोरणात ‘रेपो दर’ पाव टक्क्याने कमी झाल्याने अपेक्षेप्रमाणे बँकानी आता त्याचा लाभ आपल्या कर्जदारांपर्यंत पोहोचण्यास सुरूवातही केली आहे. राष्ट्रीयीकृत आयडीबीआय बँकेने कालच आधार दरात (बेस रेट) पाव टक्क्यांनी कमी करण्याची लगोलग घोषणाही केली, तर बुधवारी खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने आपली वाहन कर्जे १ फेब्रुवारीपासून अर्धा टक्क्यांनी स्वस्त होत असल्याची घोषणा केली. एचडीएफसी बँकेने कार लोनवरील कर्जाचा व्याजदर पाव टक्क्यांनी तर दुचाकीसाठी कर्जाचा व्याजदर अर्धा टक्क्यांनी कमी केला आहे. त्याचप्रमाणे वाणिज्य वाहनांसाठीचे कर्जही पाव टक्क्यांनी १ फेब्रुवारीपासून स्वस्त होत असल्याचे बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अधिकृतपणे सांगितले. एचडीएफसी बँकेने गेल्याच महिन्यात आपल्या आधार दरात ०.१ टक्क्यांची कपात करून तो सध्याच्या बँकिंग व्यवस्थेत सर्वात कमी म्हणजे ९.७ टक्क्यांवर आणला आहे. एचडीएफसी बँकेकडून तब्बल ३३ हजार कोटींची वाहन कर्ज वितरीत करण्यात आली असून, दरसाल त्यात १२ टक्क्यांनी वाढ होत आहे. नवीन व्याजदर सुधारणेनंतर बँकेच्या तीन ते पाच वर्षे मुदतीच्या कारसाठीच्या कर्जाचा दर किमान १०.५ टक्के ते कमाल ११.५ टक्के वार्षिक असा होईल. दुचाकींच्या कर्जाचा दरही वार्षिक १९.२५ टक्के ते २२.२५ टक्के या पातळीवर येईल.