सर्वाधिक हिश्श्यासह वर्चस्व प्राप्त करण्याच्या चर्चेत असलेल्या मंगलोर केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायझर्सच्या संचालकपदावरून विजय मल्या हे पायउतार झाले आहेत. यूबी समूहाची मालकी असलेल्या या उपकंपनीतून बाहेर पडताना अध्यक्ष मल्या यांनी कोणतेही कारण स्पष्ट केले नाही.
मंगलोर केमिकल्समध्ये युनायटेड स्पिरिटद्वारे मल्या यांचे अस्तित्व होते. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये कंपनी अल्पहिश्श्यात आली होती. कंपनीच्या प्रस्तावित १२ नियम बदलांपैकी ९ ला मल्याद्वारे विरोध करण्यात आला होता. मंगलोरमधील खुल्या भागविक्रीतही मल्या मागे पडले होते. उलट उद्योगपती सरोज कुमार पोद्दार (झुआरी समूह) व दीपक फर्टिलायझर्सने यासाठी स्पर्धा केली.
दीपक फर्टिलायझर्स अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्सने मंगलोर केमिकल्समध्ये ३२ टक्के हिस्सा राखला आहे. तर मल्या आणि पोदार यांचा मिळून ३८ टक्केहिस्सा आहे. स्वत: मल्या यांच्या कंपनीला हिस्सा वाढविता आला नाही. उलट कंपनीची पुनर्रचना होणार असून त्यात पोदार यांच्या मालकीच्या अ‍ॅडव्हेण्ट्झ समूहाला प्रतिनिधित्व मिळणार आहे.
दरम्यान, मल्या यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताने मंगलोर केमिकल्सचा समभाग व्यवहारात तब्बल १९.९७ टक्क्यांनी वधारला. सत्रात मुंबई शेअर बाजार दफ्तरी त्याला ९७.९० रुपये भाव मिळाला. तर व्यवहाराअखेर ९.३८ टक्क्यांनी उंचावून तो ८९.२५ वर स्थिरावला.

Story img Loader