वकिलामार्फत सर्वोच्च न्यायालयाला तडजोड प्रस्ताव सादर
मद्यसम्राट उद्योगपती विजय मल्या यांनी ३१ सप्टेंबर २०१६ अखेर बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या ६९०३ कोटींच्या थकबाकीपैकी ४ हजार कोटी रुपये परत करणार असल्याचे बुधवारी सूचित केले आहे.
मल्या यांनी बँकांकडून घेतलेल्या ९,००० कोटींच्या कर्जाची परतफेड केलेली नाही; पण आताचा प्रस्ताव हा बँकसमूहाशी निगडित कर्जाबाबत असून तो ६,९०३ कोटींच्या रकमेपुरता मर्यादित आहे. मल्या यांनी स्टेट बँकेसह अनेक बँकांकडून कर्ज घेतले होते व त्याची परतफेड न करता ते ब्रिटनला निघून गेले आहेत. सुरुवातीला २ हजार कोटी रुपये भरले जातील व नंतर २ हजार कोटींची उर्वरित रक्कम दिली जाईल, असे त्यांनी त्यांचे वकील सी. एस. वैद्यनाथन यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयाला कळवले आहे.
मल्या हे लंडनमधून भारतात परत येणार की नाही हे त्यांच्या वकिलाने सांगितले नाही. ४ हजार कोटी रुपयांची परतफेड करण्याच्या मल्या यांच्या प्रस्तावावर सर्वोच्च न्यायालयाने बँकसमूहास ७ एप्रिलपर्यंत म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे.
मल्या व किंगफिशर यांच्यासह युनायटेड ब्रुअरीज लि. व किंगफिशर फिनव्हेस्ट (इंडिया) लि. यांनी चार हजार कोटी परत करण्याचा प्रस्ताव मांडला असून, न्या. कुरियन जोसेफ व आर. एफ. नरिमन यांच्यापुढे आज सुनावणी झाली. वरिष्ठ वकील सी. व्ही. वैद्यनाथन यांनी किंगफिशर व मल्या यांच्या वतीने बाजू मांडताना हा प्रस्ताव सादर केला असून, त्याची प्रत बँकसमूहाला दिली. बँकांच्या वकिलाने सांगितले, की आम्ही या प्रस्तावावर विचार करून प्रतिसाद देऊ. वैद्यनाथन यांनी न्यायालयाला अशी विनंती केली, की हा प्रस्ताव सीलबंद ठेवण्यात यावा. कारण अजून त्यावर वाटाघाटी सुरू असून विनाकारण वातावरण कलुषित होऊ शकते.
मल्या लंडनला गेल्यानंतर बँकांची कर्ज परतफेडीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयापुढे आली होती व त्यात मल्या यांना भारताबाहेर जाण्यापासून रोखावे अशी मागणी करण्यात आली होती, पण ते त्याआधीच निघून गेले होते.
बुधवारी झालेल्या सुनावणीत मल्या यांनी प्रसारमाध्यमांनी आपल्याविरुद्ध अपप्रचार केल्याचा आरोप केला असून, कर्जाची परतफेड करण्याचे आश्वासन वकिलामार्फत दिले आहे.

 

स्टेट बँकेचा निर्वाळा
मुंबई : थकीत कर्ज देणीबाबत तडजोड करण्यास किंगफिशर एअरलाईन्सने तयारी दाखविल्याचे स्टेट बँकेने बुधवारी मान्य केले. याबाबत कंपनीकडून प्रस्ताव आला असून त्यावर विचार सुरू असल्याचे सार्वजनिक बँकेने स्पष्ट केले. किंगफिशर एअरलाईन्सकडून कोटय़वधीची कर्ज रक्कम थकीत असून ती तडजोडीने सोडविण्याची तयारी कंपनीने दाखविल्याची माहिती बँकेने एका पत्रकाद्वारे दिली. याबाबत आम्ही अन्य बँकांबरोबर बसून विचारविमर्श करू, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र पत्रकात रकमेचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

 

‘सिद्धार्थला बदनाम करू नका’
माझ्या उद्योगाशी मुलगा सिद्धार्थ यांचा संबंध नाही. त्यामुळे जी टीका करायची ती माझ्यावर करा उगाच मुलाला बदनाम करू नका. कर्जफेडीच्या वादात मुलाला ओढू नका. माझा मुलगा सिद्धार्थ याला दोष देऊ नका. जी काय टीका करायची ती माझ्यावर करा.
– विजय मल्या.

 

‘पॉन्झीं’ना कठोर शिक्षेची शिफारस
नवी दिल्ली : गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या विविध योजना राबविणाऱ्या (पॉन्झी स्कीम) व्यक्ती तसेच संबंधित कंपन्यांच्या प्रवर्तकांविरुद्ध कठोर शिक्षेची शिफारस सरकारला करण्यात आली आहे. यामध्ये १० वर्षे तुरुंगवास ते ५० कोटी रुपयेपर्यंतचा दंडाचा समावेश आहे. या प्रस्तावावर ३० एप्रिलपर्यंत सूचना मागविण्यात आल्या आहेत. आंतर मंत्रीगट समितीने नव्या विधेयकाचा आराखडा सरकारला सादर केला आहे. त्यात किमान एक वर्ष शिक्षा ते दंड १० लाख रुपये करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

Story img Loader