वायर्स आणि केबल्स तसेच विजेच्या उपकरणांच्या निर्मितीत कार्यरत असलेल्या व्हिटो स्विचगीयर्स अ‍ॅण्ड केबल्स लिमिटेडने खुल्या समभाग विक्रीच्या माध्यमातून आपल्या विस्तारीकरण कार्यक्रमासाठी भांडवलाची गरज पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) लघु व मध्यम उद्योगांसाठी स्थापित ‘ईमर्ज’ या मंचावर सूचिबद्धतेसाठी असलेल्या या बुक-बिल्डिंग प्रक्रियेच्या भागविक्रीत सामान्य गुंतवणूकदारांना प्रत्येकी १० रु. दर्शनी मूल्याच्या समभागासाठी किमान रु. ४८ ते कमाल रु. ५० या दरम्यान बोली लावता येईल. ३ डिसेंबर २०१२ पासून सुरू होणारी ही भागविक्री बुधवार, ५ डिसेंबर रोजी समाप्त होईल.
विष्णू कुमार गुरनानी, मोहनदास गुरनानी आणि नारायण दास गुरनानी यांनी प्रवर्तित केलेल्या व्हिटो स्विचगीयर्सकडून हरिद्वार, उत्तराखंड येथील उत्पादन सुविधांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. भागविक्रीतून अपेक्षित असलेला २५ कोटी रु. निधी अंशत: या उद्दिष्टासाठी तसेच दीर्घकालीन खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी वापरात येणार आहे. ‘क्रिसिल’ या मानांकन संस्थेने या भागविक्रीला ‘एसएमई ग्रेड ४/५’ असे उत्तम मानांकन बहाल केले आहे. की-नोट कॉर्पोरेट सव्‍‌र्हिसेस आणि इंडियन ओव्हरसीज बँक या भागविक्रीच्या बुक-रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.