सरकार, कंपनीला नोटीस
जर्मनीच्या कंपनीच्या वाहनांनी विषारी वायू उत्सर्जन मर्यादांचे उल्लंघन केल्याने त्या वाहनांचे उत्पादन व विक्री यावर बंदी घालण्याची याचिका सादर करण्यात आली असून त्यावर राष्ट्रीय हरित लवादाने केंद्र सरकारला म्हणणे मांडण्याचा आदेश देणारी नोटीस बजावली आहे.
राष्ट्रीय हरित लवादाचे प्रमुख न्यायाधीश स्वतंत्र कुमार यांनी जड उद्योग व सार्वजनिक उद्योग, पर्यावरण व वन मंत्रालय, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व फोक्सवॅगन समूह यांना नोटीस दिली आहे. त्यावर २३ डिसेंबपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.
दिल्लीच्या शाळा शिक्षिका सलोनी ऐलावाडी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर लवादाने म्हटले आहे, की फोक्सवॅगन व समूहातील इतर कंपन्यांकडून केले जाणारे वाहनांचे उत्पादन व विक्री करण्यास मनाई करण्यात यावी. ऐलावाडी यांनी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) या संस्थेच्या अहवालाच्या आधारे याचिका दाखल केली असून फोक्सवॅगन व समूहातील इतर कंपन्या प्रदूषण नियमांचे बेदरकारपणे उल्लंघन करीत आहेत कारण त्यातून मर्यादेपक्षा नऊ पट अधिक नायट्रोजन ऑक्साइड सोडला जात आहे. पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याची कबुली फोक्सवॅगनने दिली असून त्यामुळे भारतीय तसेच जागतिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. फोक्सव्ॉगनने उत्पादित केलेली वाहने मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण करीत असून लाखो लोकांना विषारी वायूचा त्रास होत आहे असे याचिकेत म्हटले आहे. ही वाहने आयात किंवा विक्री करताना त्यांची कसून तपासणी करावी शिवाय यापुढील विक्री थांबवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. फोक्सवॅगनच्या जेट्टा, ऑक्टाव्हिया, ऑडी ए ४, व ऑडी ए ६ या डिझेल मॉडेल्समध्ये दोष आढळून आले आहेत. फोक्सव्ॉगनने १.१० कोटी डिझेल इंजिनात प्रदूषण तपासणीवेळी फसवणूक करणारे सॉफ्टवेअर लावल्याची कबुली दिली आहे.