वाहनातून होणाऱ्या वायू उत्सर्जन प्रमाणाची चाचणी कमी नोंदविणारे सॉफ्टवेअर बसवून फसवणूक केल्या प्रकरणात फोक्सव्ॉगनशी निगडित विविध घडामोडींनी पुन्हा एकदा वेग घेतला. यामध्ये कंपनीच्या वाहनाची नव्याने चाचणी करण्याच्या भारताच्या मोहीम विस्ताराचाही समावेश आहे.
भारत : कंपनीच्या भारतातील वाहनांची वायू उत्सर्जनविषयक चाचणी महिनाभरासाठी विस्तारण्यात आली आहे. याबाबत तपासाचे आदेश अवजड उद्योग मंत्रालयाने ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ला दिले होते. त्यासाठी असलेली आठवडय़ाची मुदत आता ऑक्टोबर अखेपर्यंत विस्तारण्यात आली आहे. या कालावधीत फोक्सव्ॉगनसह ऑडी, स्कोडाच्या वाहनांचीही तपासणी होणार आहे.
जर्मनी : फोक्सव्ॉगनच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याविरुद्ध अद्याप चौकशी सुरू करण्यात आली नसल्याचे सरकारी वकिलांनी स्पष्ट केले आहे. तपास यंत्रणेच्या अखत्यारित अद्याप कंपनीच्या कोणत्याही अधिकाऱ्याची वैयक्तिक विचारणा केली नसल्याचेही हा वकील म्हणाला.
ऑस्ट्रेलिया : देशातील स्पर्धा व ग्राहक आयोगानेही ७.८० लाख डॉलरच्या दंडाचा इशारा कंपनीला दिला आहे. याबाबत कंपनीच्या देशातील प्रमुखाकडून आलेल्या स्पष्टीकरणानंतर निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
दक्षिण कोरिया : कंपनीच्या डिझेल बनावटीची १.२० लाख वाहने माघारी बोलाविण्याचे पाऊल दक्षिण कोरियात उचलण्यात आले आहे. याबाबत देशाच्या पर्यावरण मंत्रालयाला फोक्सव्ॉगनने पत्र पाठवून ही मोहीम राबविण्याचे जाहीर केले आहे.