रिझव्र्ह बँकेचे मंगळवारी पतधोरण; यंदा स्थिर व्याजदराची अटकळ
भारतीय रिझव्र्ह बँकेच्या पाचव्या द्विमासिक पतधोरणाची घोषणा येत्या मंगळवार, १ डिसेंबर रोजी होणार असून त्यात विद्यमान व्याजदर स्थिर ठेवण्याची शक्यता अधिक दिसते. यापूर्वी धक्कादायक एकदम अध्र्या टक्क्य़ाची कपात करणाऱ्या गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्यामार्फत फेब्रुवारीमध्ये किमान पाव टक्के दर कपात होऊ शकते.
मध्यवर्ती बँक येत्या मंगळवारी पतधोरण आढावा घेईल, असे शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले. बँकेचे हे २०१५ – १६ या चालू आर्थिक वर्षांतील पाचवे द्विमासिक पतधोरण असेल. डॉ. राजन हे या दिवशी सकाळी ते जाहीर करतील.
रिझव्र्ह बँकेने २९ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या पतधोरणात घसघशीत व अनपेक्षित अध्र्या टक्क्य़ाची दर कपात केली होती. यावेळी हे दर ६.७५ टक्क्य़ांवर आणून ठेवण्यात आले. अर्थविकासाला तसेच उद्योगांना चालना देण्यासाठी तमाम क्षेत्रातून यापूर्वीही दर कपातीची मागणी होत असतानात सप्टेंबरमध्ये ती अचानक मोठय़ा प्रमाणात करण्यात आली होती. यानंतर स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँकेसह अनेक बँकांनी त्यांचे गृह, वाहन आदी कर्ज स्वस्त केले होते. यंदा मात्र तुलनेत दर कपात होण्याची कमी शक्यता वर्तविण्यात आली आहे. डिसेंबरअखेर अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हचेही संभाव्य व्याजदर वाढीचे धोरण जाहीर झाल्यानंतर येथील रिझव्र्ह बँकेला निर्णय घेणे सुलभ होण्याच्या शक्यतेवर हा अंदाज आहे.
जागतिक वित्त सेवा कंपनी बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचनेही रिझव्र्ह बँक यंदा दर कपातीसाठी पाऊल उचलणार नाही, अशी शंका उपस्थित केली आहे. ती फेब्रुवारी २०१६ मध्ये होईल, असेही नमूद केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा