नोकरी मुंबईत तर निवासस्थान पुण्यात व त्यातून होणारी आबाळ हे नवे नाही. हे धोरण बदलण्यावर राज्य सरकारने नव्या उद्योग धोरणात भर दिला असून, एकात्मिक उद्योग क्षेत्र ही संकल्पना विकसित करण्यात येणार आहे. नोकरी, निवासस्थान, व्यापारी संकुल, बाजारपेठ सारेच एकाच विभागात अशी राज्य शासनाची योजना आहे. ‘वॉक टू वर्क’ ही परदेशातील संकल्पना राज्यातही राबविण्याचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रयत्न आहे. त्यातूनच नव्या उद्योग धोरणात एकात्मिक उद्योग क्षेत्र (इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल एरिया) तयार करण्यात येणार आहे. विशेष आर्थिक क्षेत्रासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींमध्ये ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या संपादित केलेल्या जमिनींपैकी ४० टक्के जागेचा वापर हा व्यापारी, घरबांधणी किंवा अन्य क्षेत्रांच्या विकासाकरिता करण्यात येणार आहे. घरबांधणी करताना त्या क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांनाच तेथे घरे घेता येतील का, किंवा बाहेरच्या लोकांना तेथे प्रवेश मिळेल या प्रश्नावर जमशेदपूरच्या टाटाच्या संकुलाक काय फक्त तेथे काम करणारे लोक राहात नाहीत, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.
उद्योगांना वीज दरात सवलत
उद्योगांसाठी सरकारकडून विजेसाठी जास्त आकारणी करण्यात येते, अशी उद्योजकांची तक्रार आहे. यावर वीज दरात काही सवलत देता येईल का, याबाबत विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. मेगा प्रकल्पात जेवढी गुंतवणूक करण्यात येईल तेवढी रक्कमेचा परतावा देण्याची सरकारची तयारी असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Walk to work