पीटीआय, नवी दिल्ली : रुपयाच्या कमकुवतपणाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणे स्वाभाविकच आहे, परंतु त्यापायी चिंता करावी अशी स्थिती नाही, असा निर्वाळा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी येथे दिला. येथील एका कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना, डॉलरच्या तुलनेत ७८.९२ या अभूतपूर्व नीचांकपदापर्यंत पोहोचलेल्या देशाच्या चलनाच्या मूल्यातील घसरणीवर सरकार लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भू-राजकीय तणाव, अर्थवृद्धीबाबत चिंता, खनिज तेलाच्या तापलेल्या आंतरराष्ट्रीय किमती, चढी चलनवाढ आणि जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून कठोर धोरणाचा अवलंब यामुळे उदयोन्मुख बाजारपेठेतील चलन हे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत तीव्र रूपात घसरत आहेत. तथापि अन्य जागतिक चलनांमध्ये जी पडझड सुरू आहे त्या तुलनेत भारतीय चलनाची कामगिरी चांगली आहे, असे सीतारामन म्हणाल्या.

आपली अर्थव्यवस्था बंदिस्त नाही. जागतिकीकृत विश्वाचाच एक भाग आपण आहोत. त्यामुळे (जागतिक घडामोडींचा) आपल्यावर स्वाभाविकपणे परिणाम होईल. तरी तुलनेने आपण चांगल्या स्थितीत आहोत, असे अर्थमंत्र्यांनी या प्रसंगी सांगितले. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या वाटचालीबाबत विचारल्या गेलेल्या प्रश्नाला त्या उत्तर देत होत्या.

रुपयाच्या विनिमय मूल्याने बुधवारी प्रथमच भावनिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण प्रति डॉलर ७९ च्या पातळीचा भंग केला आणि या महिन्यात सलगपणे सार्वकालिक नीचांकांची मालिकाही त्याची सुरू राहिली आहे. गुरुवारच्या व्यवहारात मात्र स्थानिक चलन अमेरिकी डॉलरच्या तुलनेत पाच पैशांनी वाढून ७८.९८ या पातळीवर दिवसअखेरीस स्थिरावला.

Story img Loader