भारतासारख्या महाकाय देशात छोटय़ा व्यावसायिकांकडून त्यांची उत्पादने तसेच सेवा थेट ग्राहकांवर बिंबविण्यासाठी संकेतस्थळासारखा मार्ग अधिक चोखाळला जात असून नजीकच्या कालावधीत एक ते दीड कोटी नव्या संकेतस्थळांची आवश्यकता भासणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
देशात २.६ कोटी छोटे व्यवसाय आहेत. तर जवळपास ५ लाख व्यावसायिकांचे स्वत:चे संकेतस्थळ आहे. आजघडीला एकूण लोकसंख्येच्या केवळ १० टक्के म्हणजेच १२ कोटी भारतीय ऑनलाईन आहेत.
त्यामुळे येत्या तीन ते चार वर्षांत देशातील छोटय़ा व्यावसायिकांसाठी किमान दिड कोटी संकेतस्थळांची आवश्यकता भासणार आहे, असे मत ‘वेब बझार’चे मुख्य कार्यकारी अधिकारी हिमांशू साहनी यांनी ‘लोकसत्ता’जवळ व्यक्त केले.
उत्पादने तसेच सेवा शोधण्यासाठी मोठय़ा प्रमाणात संकेतस्थळाचा वापर होतो. माहिती तंत्रज्ञानाचा जलद मार्ग संकेतस्थळच आहे. गुंतवणुकीवरील अधिक परतावा देण्यासह विपणन धोरणही आखले जाते. गेल्या दशकभरात ८ ते १० कोटी नवे व्यवसाय सुरू झाले आहेत. स्वत:च्या संकेतस्थळाच्या माध्यमातून छोटय़ा व्यावसायिकांना आपले कार्य, उत्पादन, सेवा यांची माहिती इच्छित वर्गापर्यंत पोहोचविता येते.
साहनी यांनी सांगितले की, कंपनी आता निमशहरांमध्ये अधिक विस्तार करणार आहे. कंपनीने नुकतीच महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे आपली एक शाखा सुरू केली आहे. कंपनीमार्फत येथे महिन्याला १० ते १२ नवीन संकेतस्थळ तयार करण्याची मागणी नोंदविली जाते. कंपनी आणखी चार दालने सुरू करण्याच्या विचारात आहे. छोटय़ा तसेच निमशहरांमधूनच ८० टक्क्यांपर्यंतचा व्यवसाय या क्षेत्रात आहे, असा विश्वासही त्यांना आहे.
२००८ मध्ये ‘वेब बझार’च्या कार्याला सुरुवात झाली. आजपर्यंत तिचे १,२०० ग्राहक कंपन्या आहेत. तर मार्च २०१३ अखेर २५ हून अधिक भागीदार आहेत. कंपनीची देशभरात २५ फ्रँचाईझी दालने आहेत. व्यावसायिक संकेतस्थळ तयार करून देण्यारे भारतीय क्षेत्र सध्या वार्षिक ३० ते ३५ टक्के दराने वाढत आहे. कंपनीकडे सध्या ६५ टक्के मागणी ही तूर्त बांधील असलेल्या कंपन्यांकडूनच येते.
ऑनलाइन भारतीयांची संख्या १२ कोटी
छोटे व्यावसायिक २.६ कोटी
संकेतस्थळ असणारे ५ लाख
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा