सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com
मागील सप्ताहात करोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सावध झालेला बाजार या सप्ताहाच्या सुरुवातीला दूरसंचार कंपन्यांकडून सरकारकडे भरायच्या थकबाकीतील तुटीच्या संशयाने भयग्रस्त झाला आणि बाजाराची घसरण कायम राहिली. कारण या डोईजड थकबाकीचे परिणाम या कंपन्यांना कर्ज देणाऱ्या बँकांवर तसेच या कंपन्यांच्या रोख्यांमधे गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडांवरही होणार आहेत. परंतु सरकारकडून दूरसंचार कंपन्यांसाठी विशेष निधीच्या तोडग्यावर विचारविनिमय होण्याचे संकेत मिळाले. तसेच चीनमधील संकट आटोक्यात येऊन बहुतांश उद्योगांना पूर्वपदावर येण्यासाठी सरकार मदत करणार असल्याच्या बातमीने शेवटच्या दोन दिवसांत बाजार सावरला. परिणामी सप्ताहात सेन्सेक्स केवळ ८७ अंशांची तर निफ्टी ३० अंशांची घट होऊन बंद झाला.
गेल्या सोमवारी विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या अॅव्हेन्यू सुपरमार्टची २,३१६ रुपये ही विक्री किंमत अनेकांना जास्त वाटली. पण ज्यांनी या विषेश विक्रीत सहभाग घेतला त्यांना गुरुवारचा २,४६२ रुपयांचा बंद भाव पाहून समाधान वाटले. आयआरसीटीसीचे समभागही असेच सामान्य गुंतवणूकदारांना चकवा देणारे ठरले आहेत. पाच महिन्यांपूर्वी ३२० रुपयांना प्रारंभिक विक्री झालेल्या समभागांचे बाजार मूल्य टप्प्याटप्प्याने वाढत १,९३० रुपये झाले आहे. सध्याच्या कठीण आर्थिक परिस्थितीत ज्या कंपन्यांचे निकाल व नफ्याचे आकडे चांगले आहेत ते कंपनी करातील सवलतींमुळे तर आहेतच परंतु बाजारात टिकून रहाण्याची क्षमता, कर्जाचे अल्प प्रमाण व काटकसरीने खर्चावरील नियंत्रण अशा घटकांना बाजार महत्त्व देतो आहे. सध्या बाजारात काही मोजक्या समभागातच वाढ झालेली दिसते. पण हे चांगले लक्षण आहे व बाजारातील अशा कंपन्यांचे वाढते मूल्य हा कृत्रिम फुगवटा (बबल) नाही. त्यामुळे जरी बाजार मूल्य जास्त वाटले तरी अॅव्हेन्यू सूपरमार्ट, आयआरसीटीसी, बजाज फायनान्स, बजाज फिनसव्र्ह, एशियन पेंट्स, पेज इंडस्ट्रीज, टायटन, श्री सिमेंट सारख्या समभागांची दीर्घ मुदतीसाठी योग्य वेळी केलेली खरेदी गुंतवणूकदारांच्या संपत्तीमधे वाढच करीत असते.
अॅक्सिस बॅंकेचा मॅक्स लाईफमधील भांडवली हिस्सा २० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा विचार आहे. जवळजवळ प्रत्येक बॅंकेची विमा कंपनीशी भागीदारी असते. बॅंकांच्या वितरण शाखांचे जाळे व सामान्य ग्राहकांबरोबरचे रोजचे संबंध या व्यवसायाला पूरक ठरतात. विमा कंपन्यांसाठी बँक अॅश्युरन्स हा विमा वितरणाचा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. विमा कंपन्या बँकांच्या शाखांचा उपयोग संभाव्य ग्राहकांपर्यंत आपली उत्पादने पोहचविण्यासाठी करतात, तर बँकांना व्याजाव्यतिरिक्त अन्य उत्पन्न विमा कंपनीकडून मिळत असते. विमा कंपनीसाठी बँक मध्यस्थ म्हणून काम करते आणि विमा कंपनीचा बाजारातील व्यवसायाचा वाटा वाढविण्यासाठी बँकांची मदत होते. एलआयसीने आयडीबीआय बँकेत या कारणासाठीच गुंतवणूक केली. एलआयसीला आपली उत्पादने संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी वितरण व्यवस्था तयार झाली. खासगी जीवन विमा कंपन्यांच्या व्यवसायात मॅक्स लाइफचा नऊ टक्के वाटा आहे. अजूनही भरपूर वाव असणाऱ्या जीवन विम्यासारख्या व्यवसायातील हे पाऊल अॅक्सिस बॅंकेला लाभदायक आहे.
बाजाराला दिशा मिळण्यासाठी सध्या देशांतर्गत कुठलेच ठोस कारण नाही. विदेशी बाजारांच्या हालचाली पाहून बाजार आपली दिशा ठरवीत आहे. एकीकडे रोकडसुलभता व प्रथितयश कंपन्यांचे नफ्याचे आकडे, उत्तम रब्बी पिकांची अपेक्षा तर दुसरीकडे करोना विषाणूचे संकट बाजाराला मर्यादित पातळीत ठेवत आहे. अमेरिकन अध्यक्षांच्या भारत भेटीत व्यापारविषयक कुठलेही सामंजस्य करार होणार नसले तरी या बलाढय़ देशाबरोबरच्या विशेषत: संरक्षणविषयक करारांवर बाजार लक्ष ठेवून असेल.