सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com
मागील आठवडय़ाच्या शेवटच्या दोन दिवशी बाजाराने घेतलेली झेप या आठवडय़ात पहिल्या दिवशीही टिकली. मात्र बाकीच्या दिवशी बाजारात झालेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे घसरलेल्या प्रत्येक पातळीवर खरेदी मात्र होत राहिली आणि बाजाराने नवी शिखरे प्रस्थापित करत एकूण रोख तेजीचाच ठेवला. साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्समध्ये ३४६ अंशांची तर निफ्टी निर्देशांकात ९६ अंशांची वाढ झाली.
इन्फोसिसमधील सुशासनाबाबत निर्माण झालेले मळभ दूर झाल्यामुळे व भविष्यातील उत्पन्न व नफ्यातील वाढीच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या विश्वासामुळे इन्फोसिसमधील गुंतवणूक अजूनही आशादायक वाटते.
दूरसंचार कंपन्यांच्या समयोजित एकूण महसुलाच्या (एजीआर) व्याख्येबाबतची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे व्होडाफोन-आयडिया व भारती एअरटेल कंपन्यांना मोठा हादरा बसला. भारती एअरटेलने नुकतीच भांडवल उभारणी केल्यामुळे व रिलायन्सला तुलनात्मक कमी फटका बसल्यामुळे बाजारात त्यांच्या समभागांना निकालानंतरही मागणी राहिली. परंतु व्होडाफोन आयडिया व त्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या स्टेट बँक, इंडसइंड बँक व कोटक बँकेच्या समभागावरही बाजारात नकारात्मक प्रतिक्रिया उमटली. स्टेट बँकेतील घट खरेदीची संधी देऊ शकते.
टाटा समूहातील रॅलीज इंडियाने तिमाहीत उत्पन्नात ३७ टक्के तर नफ्यात ६३ टक्के वाढ जाहीर केली. बाजारात त्याचे स्वागत होऊन कंपनीचा समभाग १६ टक्क्यांनी वर गेला. रब्बी पिकांच्या विक्रमी लागवडीमुळे व खनिज तेलावर आधारित कच्च्या मालाच्या किमती नियंत्रणात राहिल्यामुळे खते व शेतीपूरक रसायने बनविणाऱ्या पीआय इंडस्ट्रीज, कॉरोमंडल इंटरनॅशनल सारख्या कंपन्यांचे निकाल चांगले येण्याची शक्यता आहे.
महागाईच्या दराने पाच वर्षांतील उच्चांक (७.३५%) गाठला ज्याला भाजीपाला व कडधान्यांतील भाववाढ जास्त जबाबदार आहे. रिझव्र्ह बँकेच्या सहनशील मर्यादेच्या म्हणजे सहा टक्क्यांच्या तो वर गेला आहे. यामुळे व्याज दर नजीकच्या काळात कमी होण्याची आशाही मावळली आहे. अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर निघायलाही मर्यादा येऊ शकतात. परंतु दुसऱ्या अंगाने विचार करता भाजीपाला, दुधाच्या दर वाढीने ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढून ग्राहकोपयोगी इतर वस्तूंची मागणी वाढू शकते. उशिरापर्यंत टिकलेल्या पावसामुळे या वर्षी खरीप पिकांचे उत्पादन सरासरीपेक्षा कमी झाले, परंतु डिसेंबरअखेरीस जलाशयातील जलसाठा क्षमतेच्या ८० टक्के (मागील वर्षी डिसेंबर अखेरीस ६४ टक्के) असल्याने रब्बी पिकांचे विक्रमी उत्पादन येऊ शकेल. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेतील क्रयशक्ती वाढण्याची शक्यता आहे. परिणामी दुचाकी व विवेकी उपभोग्य वस्तू यांची मागणी वाढेल. शेतीची अवजारे, खते, दुचाकी व इतर उपभोग्य वस्तूंवर हा पैसा खर्च होऊ शकतो. मागणीला चालना मिळण्याची आशा अर्थव्यवस्थेला तसेच बाजाराला पूरक आहे. ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक, मिहद्र, एस्कॉर्ट्स, मारुती यांच्यातील गुंतवणूक वर्ष दीड वर्षांत फायद्याची ठरू शकेल.
रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएसचे तिमाही निकाल बाजार बंद झाल्यावर आल्यामुळे त्यावर बाजाराची प्रतिक्रिया सोमवारीच मिळेल. पुढील आठवडय़ातील अॅक्सिस बँक, लार्सन आणि टुब्रो, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स या दिग्गज कंपन्यांच्या निकालांकडे बाजाराचे लक्ष राहील.