काही काही आडनावे जशी भारदस्त असतात तसे शेअर बाजारात काही शब्द वजनदार वाटतात, मात्र त्याचा अर्थ बहुतेक वेळा अगदी सोपा असतो. ऑक्शन, पे आऊट, कस्टोडिअन, पोर्टफोलिओ वगरे शब्द त्यापकीच! शेअर्स, डिबेंचर्स, बाँड्स, म्युच्युअल फंडाचे युनिट्स, एक्सचेंज ट्रेडेड फंड याचा एक समूह (संच) म्हणजेच पोर्टफोलिओ. अर्थात या संचाचा धनी मी म्हणजेच गुंतवणूकदार असणार हे उघड आहे. माझ्या घरात टीव्ही आहे, फ्रीज आहे, कॉम्प्युटर आहे तसेच माझ्याकडील संचात म्हणजेच पोर्टफोलिओमध्ये वरील सिक्युरिटीज आहेत. अर्थात या पोर्टफोलिओचे व्यवस्थापन मी स्वत: करीन किंवा माझ्यावतीने कुणी तरी आíथक तज्ज्ञ करील इतकेच. हा तज्ज्ञ म्हणजे एखादी व्यक्ती असू शकेल किंवा संस्था असू शकेल, एखादा हेज फंड असेल किंवा एखादी बँक पण असेल. अर्थात आपला पोर्टफोलिओ इतका सोवळा असेलच असे नाही. त्यात सोने, चांदी, रिअल इस्टेट, कमॉडिटीज इतकेच काय तर जुनी नाणी, पोस्टाचे दुर्मीळ स्टॅम्प, पेंटिंग्ज, रोकड नगददेखील असू शकते.  शेअर्सपुरतेच बोलायचे तर पोर्टफोलिओमध्ये फार जास्त कंपन्या असू नयेत, असे तज्ज्ञ मंडळी किंवा फायनान्शिअल प्लॅनर्स सांगत असतात. कारण जितक्या जास्त कंपन्यांचे शेअर्स तितके त्यावर  लक्ष ठेवणे दुरापास्त. तज्ज्ञांच्या मते सुमार पाच-सहा उद्योगांतील  मिळून १८ ते २० कंपन्या खूप झाल्या. अर्थात प्रत्येकाच्या आíथक कुवतीनुसार हे आकडे कमी-जास्त होऊ शकतात. नित्यनेमाने येणाऱ्या विविध बातम्या, कंपन्यांचे अहवाल, नियामक संस्थांची बदललेली धोरणे किंवा नियम याची सतत जाण ठेवून त्यानुसार एखादी कंपनी पोर्टफोलिओमधून कमी करून त्याच्या ऐवजी दुसरी एखादी कंपनी आणण्याचा विचार कधीकधी शहाणपणाचा ठरतो. रातोरात पोर्टफोलिओ बनत नाही हे तर सत्य आहे. त्यासाठी सुमारे आठ ते दहा महिन्यांचा काळ तरी लागतो. तरलता म्हणजेच लिक्विडीटी हा एक महत्त्वाचा निकष असलाच पाहिजे.
गेल्या महिन्याभरात योगायोगाने असेल पण ट्रेडिंग तसेच डिमॅट खाती बंद करताना आलेल्या अडचणी, त्रास वगरे तक्रारी खूप प्रमाणात आल्या. अनेक जण आपला प्रश्न/ अडचण/ तक्रार सरळ सोप्या शब्दात न सांगता इतके गुंतागुंतीचे लिहून कळवतात की डोके गरगरायला लागावे! या सर्व आलेल्या तक्रारींना व्यक्तिश: उत्तरे दिली आहेतच, पण सार्वत्रिक स्वरूपाची माहिती म्हणून इथे लिहित आहे. प्रथमत: एक बाब लक्षात ठेवावी की, डिमॅट खाते बंद करायला चार्ज लागत नाही. अर्थात खाते बंद करतेवेळी त्यात कसल्याही सेक्युरिटीज असता नयेत म्हणजेच खात्यात शून्य बॅलन्स असला पाहिजे. काही वेळा एखादी कंपनी किंवा तिचे शेअर्स लॉक इन स्थितीत असतात, त्यामुळे डिमॅट खात्यातून ते हस्तांतरित होऊ शकत नाहीत. पर्यायाने डिमॅट खाते बंद करता येत नाही. परिणामत: खाते सुरू राहून त्यावर वार्षकि आकार डीपी वसूल करीत राहतो. असे लॉक इन स्थितीतले शेअर्स आपल्या दुसऱ्या डिमॅट खात्यात हस्तांतरण करण्यासाठी corporate action  चे माध्यम उपलब्ध आहे. याबाबत स्पष्ट निर्देश दोन्ही डिपॉझिटरीनी आपल्या डीपीना दिलेले आहेत. काही वेळा डीपीच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती नसेल, तर त्याचा त्रास खातेदाराला होतो. सर्व शेअर्स दुसऱ्या डीपीकडील खात्यात हस्तांतरित करून मूळ खाते बंद करायचे असेल तरी ती सोय आहे. मात्र दोन्ही खात्यातील नावे सारखीच असली पाहिजेत, म्हणजे हस्तांतरण आकार द्यावा लागत नाही.
एका बँक डीपीबाबत एक डिमॅट खातेदाराने केलेली तक्रार म्हणजे अनेक वेळा उच्चशिक्षित व्यक्ती किती व्यवहारशून्यपणे वागतात त्याचे उदाहरण आहे. सदर बँकेने डिमॅट खाते उघडताना थोडीशी स्पेलिंगची चूक केली. यावर उपाय म्हणजे ते खाते बंद करून नवीन खाते उघडावे. अर्थात मूळ अर्जावर तशा प्रकारची नोंद केली म्हणजे पारदर्शकता राहते. इतकी साधी बाब असताना आज अनेक दिवस तो डीपी त्या ग्राहकाला खेटे मारायला लावीत आहे. त्या ग्राहकाची काही चूक नसताना. याबाबत दोन्ही डिपॉझिटरीनी स्पष्ट निर्देश दिले आहेत पण वाचतो कोण? ट्रेडिंग अकाउंट बंद करायला काहीच अडचण नाही कारण तिथे काही शेअर्स नसतात. फत्त जी काही डिपॉझिट म्हणून रक्कम ठेवलेली असेल ती दलालाकडून परत घेतली की झाले. द्यायला खळखळ केली तर स्टॉक एक्सचेंजचा ग्राहक सेवा विभाग आहे मदत करायला. ब्रोकरकडे ट्रेडिंग खाते आणि एखाद्या बँकेत डिमॅट खाते असेही चालू शकते. त्याच ब्रोकरकडे डिमॅट खाते उघडायला हवे असे काही बंधन नसते. कारण जशी इंटरनेट बँकिंग सेवा तशीच डिपॉझिटरीची इंटरनेट सेवा असते, जिच्याद्वारे घरबसल्या इन्स्ट्रक्शन स्लिप आपली आपण पंच करू शकतो, त्यासाठी डीपीकडे जायला नको. तपशीलवार माहितीसाठी सारस्वत बँकेच्या गिरगाव शाखेत ११ जून रोजी सायंकाळी ४.३० वाजता विनामूल्य व्याख्यान आयोजित केले आहे. याउपर काही संभ्रम राहिला नसेल अशी आशा करतो. काही असेल तर ईमेलद्वारे विचारणा करावी त्यासाठी मी आहे आणि ‘लोकसत्ता’देखील आहे !!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा