व्हॉट्सअप, व्हीचॅट, इन-लाइन यासारख्या सध्या उपलब्ध असलेल्या इन्स्टंट मेसेजिंग जनमाध्यम मंचांना स्पर्धक बनून या प्रांगणात ‘मिक्सिट’ने बुधवारी मुंबईत झालेल्या अनावरणानंतर उडी घेतली आहे. केवळ स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या अ‍ॅपच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेत प्रचंड लोकप्रियता मिळविणारे ‘मिक्सिट’ अ‍ॅपचे वेगळेपण म्हणजे ते वापरण्यासाठी स्मार्टफोन असण्याची गरज नाही. भारतात तब्बल ५५ कोटींच्या घरात वापरात असलेल्या विविध ८००० प्रकारच्या सामान्य फोनवरही वापरात येईल. भारताच्या क्रिकेट विश्वविजेत्या संघाचे प्रशिक्षकपद भूषविणारे दक्षिण आफ्रिकेचे गॅरी कर्स्टन हे या अ‍ॅपचे भारतातील सदिच्छादूत आहेत. क्रिकेटवेडय़ा भारतात प्रशिक्षकाविना क्रिकेट खेळणाऱ्या लक्षावधींशी जोडले जाण्यासाठी मिक्सिट हे त्यांच्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दक्षिण आफ्रिकेत ४६ टक्के मोबाइल इंटरनेटचे ग्राहक असलेले मिक्सिटवर सक्रिय आहेत, असे या अ‍ॅपची लोकप्रियता मिक्सिट इंडिया प्रा. लि.चे मुख्याधिकारी सॅम रुफुस नल्लराज यांनी सांगितले. येत्या काळात भारतातही क्रमांक एक सोशल अ‍ॅप म्हणून नाव कमावण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखविला.
‘मिक्सिट’ जावा, नोकिया, आयओएस, अँड्रॉइड, ब्लॅकबेरी व विडोंज फोन कार्यप्रणालीसह तब्बल ८००० प्रकारच्या हँडसेट्सवर पूर्णपणे विनामूल्य डाऊनलोड करता येईल. सध्या वापरात असलेल्या मेसेजिंग अ‍ॅप्सवर कमाल १४० कॅरेक्टर्सचे संदेश पाठविता येतात, मिक्सिट संदेशांमध्ये ३०० पेक्षा जास्त कॅरेक्टर्सच्या वापराची अनुमती देते. मर्यादित मेमरीसह टूजी धाटणीची जोडणीही पुरेशी ठरत असल्याने एसएमएससाठी लागणाऱ्या कमी खर्चात हे अ‍ॅप कार्य करते.

Story img Loader