नवी दिल्ली : अन्नधान्य व उत्पादित वस्तूंच्या किमती रोडावल्याने घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर सरलेल्या जुलै महिन्यात १३.९३ टक्के असा पाच महिन्यांच्या तळात विसावल्याचे मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. तरी एप्रिल २०२१ पासून सलग १६ व्या महिन्यात घाऊक महागाई दर दोन अंकी स्तरावर कायम आहे.
महागाईच्या आगडोंबात सर्वसामान्यांची होरपळीचा प्रत्यय मे महिन्यातील घाऊक महागाई दराने विक्रमी पातळी गाठून दिला होता. मे महिन्यात घाऊक महागाई दर १५.८८ टक्क्यांवर पोहोचला होता आणि २०१२ नंतरची त्याची ही उच्चांकी पातळी होती. त्या तुलनेत जून आणि जुलैमध्येदेखील या दराने उसंत घेतल्याचे ताज्या आकडेवारीतून दिसत असले, तरी गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत त्यात वाढ झाली आहे. जुलै २०२१ मध्ये महागाई दर ११.५७ टक्के पातळीवर होता.
सलग दुसऱ्या महिन्यात घाऊक महागाई दरात घसरण झाल्याने दिलासा मिळाला आहे. जुलैमध्ये खाद्यपदार्थाची किंमतवाढीची पातळी जूनमधील १४.३९ टक्क्यांवरून कमी होत १०.७७ टक्क्यांवर आली. तर सरलेल्या महिन्यात भाज्यांच्या किंमतवाढीत लक्षणीय घट होऊन ती १८.२५ टक्क्यांवर आली आहे, जी आधीच्या महिन्यात ५६.७५ टक्क्यांवर होती. ऊर्जा व इंधन क्षेत्रातील महागाई मात्र ४३.७५ टक्क्यमंपर्यंत वाढली आहे.