आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती गेल्या तब्बल पाच वर्षांच्या तळात विसावल्या आहेत. या व्यासपीठावर मौल्यवान धातूने २०१० मधील दर पुन्हा एकदा अनुभवला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची मानले जाणाऱ्या लंडन येथील बाजारपेठेत सोमवारी तर सोने प्रति औन्स १,००० डॉलरवर येऊन ठेपले. तर चांदीचा औन्सचा दरही काहीसा कमी होत १४.८० डॉलपर्यंत खाली आला. सलग सहाव्या व्यवहारात या व्यासपीठावर मौल्यवान धातूने दरांची नरमाई दाखविली आहे. यामुळे धातू २०१० च्या समकक्ष मूल्यस्तरावर येऊन पोहोचला आहे. र्थव्यवस्थेच्या सुधाराकरिता अमेरिका व चीन हे दोन्ही देश गेल्या काही दिवसांपासून अधिक चर्चेत आहेत. त्यामुळे या दोन्ही देशातील चित्र पाहणे आवश्यक ठरेल.
अमेरिका : अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हमार्फत व्याजदर वाढविण्याची शक्यता पुन्हा निर्माण झाल्याने मौल्यवान धातूच्या उताराला निमित्त मिळाले आहे. जागतिक महासत्तेची अर्थस्थितीत सुधारत असताना येणाऱ्या सप्टेंबरपूर्वी व्याजदर वाढविण्याच्या हालचाली सुरू झाल्याने त्याचा परिणाम सोने-चांदीच्या दरांवर होऊ लागला आहे. फेडरल रिझव्र्ह व्याजदर वाढ केल्यास ती २००६ नंतरची पहिली दरवाढ ठरेल. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने यापूर्वीच दर कपातीचे संकेत दिले आहेत.
चीन : अर्थचिंतेतील चीनने यंदा मौल्यवान धातूचा कमी साठा करण्याचा मनोदय जारी केल्याने प्रामुख्याने लंडनच्या बाजारात सोन्याच्या दरात कमालीची घसरण अनुभवली गेली. जगात सर्वाधिक (भारतापेक्षाही अधिक) मौल्यवान धातूचा साठा करणाऱ्या चीनकडे गेला आठवडाअखेर १,६५८ मेट्रिक टन सोने असल्याचे स्पष्ट झाले आहे. २००९ मधील धातूच्या तुलनेत हे प्रमाण ६० टक्क्य़ांहून अधिक असल्याने चीन सोने खरेदी करणार नाही, हेही स्पष्ट झाले.
भारतातही दरांची दोन वर्षांची नरमाई
नवी दिल्ली : देशाच्या राजकीय राजधानीतही मौल्यवान धातूने गेल्या दोन वर्षांतील किमान दर सप्ताहारंभीलाच अनुभवला. नवी दिल्लीत सोन्याचे तोळ्याचे दर थेट ३०० रुपयांनी कमी होत २५,७०० रुपयांवर येऊन ठेपले. येथे चांदीच्या किलोच्या दरांमध्येही १५० रुपयांपर्यंतची घसरण झाल्याने पांढरा धातू आता ३४,२०० रुपयांवर स्थिरावला आहे.
मुंबई : शहरातील सराफा बाजारातही मौल्यवान धातूंच्या दरांमध्ये सप्ताहारंभी कमालीची घसरण नोंदली गेली. स्टॅण्डर्ड सोन्याचा भाव तोळ्यासाठी सोमवारी थेट ५२० रुपयांनी कमी होत २५,२५० रुपयांवर आले. सोने दराने आठवडय़ापूर्वीच २६ हजारांपासून फारकत घेतली आहे. तर चांदीचा दरही आता किलोमागे ३४,६५० रुपयांवर येत ३६ हजारांपासून लांब गेला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात पाच वर्षांचा तर स्थानिक पातळीवर दोन वर्षांचा तळ अनुभवणाऱ्या सोने दरांमुळे या क्षेत्रातील संबंधित भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग सोमवारी थेट १४ टक्क्य़ांपर्यंत उसळले.
सोने दर कमी झाले असले तरी तयार दागिने निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांच्या महसुलात वाढ होऊन मोसमाला धातूंची मागणी वाढेल, असे गणित बोनान्झा पोर्टफोलियोचे संपत्ती व्यवस्थापन व वित्तीय नियोजन प्रमुख अचिन गोएल यांनी मांडले.
सोने समभाग झळाळीही ओसरली..
पी सी ज्वेलर्स
रु. ४४२.५५ (+३.१७%)
टीबीझेड
रु. १५८.७० (+९.३७%)
गितांजली जेम्स
रु. ४५.२० (+१३.७१%)
राजेश एक्स्पोर्ट्स
रु. ४६४.६० (+३.९५%)
सोन्याच्या दरांमध्ये कमालीची घसरण नोंदली जात आहे. २००२ मध्ये अशीच काहीशी स्थिती होती. सोन्याकडे जोपर्यंत गुंतवणूक म्हणून मानले जाण्यासारखे चित्र निर्माण होत नाही तोपर्यंत त्यापासून लांब राहणेच हिताचे ठरेल.
जिमीत मोदी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सॅम्को सिक्युरिटीज.