जेनेरिक विरूद्ध ब्रॅण्डेड औषधे हा वाद पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या नोव्हार्टिसच्या पेटंट दाव्यावरील निकालासंबंधाने ऐरणीवर आला. एकच गुणवत्ता व परिणामकारकता असलेली पण ब्रॅण्डेड औषधांच्या तुलनेत जेनेरिक औषधे खूपच कमी किमतीत मिळू शकतात. पण या औषधांची पुरेशी उपलब्धता आहे काय हा प्रश्न आहेच.
एखादे ब्रॅण्डेड औषध व तशाच प्रकारचे जेनेरिक औषध यात काय फरक असतो या विषयावर आजकाल खूपच चर्चा सुरू आहे. औषधी उद्योगात वावरणाऱ्या प्रत्येकाला जेनेरिक औषधाचे फायदे ज्ञात आहेत. मात्र सामान्य माणूस अनभिज्ञ आहे. सर्वसाधारणपणे कोणताही रुग्ण स्वस्त औषधाचा पर्याय आहे का, असा प्रश्न विचारत नाही. वास्तविक हा पर्याय कदाचित अधिक चांगला व स्वस्तही असू शकतो.
सन २००८ मध्ये केंद्र सरकार आणि राज्य शासनाने जनऔषधी कॅम्पेन सुरू केले. ब्रॅण्डेड औषधांच्या सतत वाढणाऱ्या किमती सामान्यजनांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्या हे लक्षात घेऊन, उत्तम दर्जाची औषधे कमी व परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे.
आज जनऔषधी स्टोअर्सची व्याप्ती अनेक राज्यांत पसरली आहे. पंजाब, राजस्थान, ओरिसा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, हरयाणा, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि चंदिगड या राज्यांमध्ये सामान्यांच्या हितासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली. एखादे औषध बनविण्यासाठी येणारा खर्च काय असू शकतो, हे नव्याने पाहायची योजना होती. ज्या ग्राहकांना दुसरा व स्वस्त पर्याय निवडायचा असतो त्यांना अत्यंत कमी दरात पण त्याच गुणवत्तेची औषधे या योजनेद्वारे मिळू शकतात.
या जेनेरिक औषधांची किंमत कमी असते. कारण ब्रॅण्डेड औषधांप्रमाणे उत्पादकांना, आपले उत्पादन विकसित करण्याकरिता तसेच ते बाजारात आणण्याकरिता खर्च करावा लागत नाही. एखादे औषधे बाजारात आणण्यापूर्वी कंपनीला संशोधन व विकास (आर अ‍ॅण्ड डी) तसेच बाजाराची पाहणी व जाहिरात वगैरेवर खूप खर्च करावा लागतो. जेनेरिक औषधांची निर्मिती करताना हे खर्च येत नाहीत. ही औषधे ब्रॅण्डेड औषधांचीच एक प्रकारे कॉपी असते. तेच डोसेज, होणारे परिणाम तेच, साइड इफेक्ट्सही तेच! औषध घेण्याची पद्धतदेखील तीच. तसेच रिस्क, सेफ्टी आणि स्ट्रेंग्थच्या नॉम्र्सही त्याच. जणू काही मूळ औषधच.
(प्रस्तुत लेखक विको लॅबॉरेटरिज् कंपनीचे संचालक असून, त्यांच्या ई-मेल: viccolabs@satyam.net.in वर संपर्क साधता येईल.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा