कारकिर्दीतील पहिले पतधोरण जाहीर करताना रिझव्‍‌र्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांना यंदा व्याजदर कपातीला खूपच कमी वाव आहे. महागाई दर मध्यवर्ती बँकेच्या अपेक्षेच्या खूपच पुढे प्रवास करत असल्याने रेपो अथवा सीआरआर कपातीची शक्यता कमी आहे. त्याऐवजी डॉलरच्या तुलनेत सावरलेला रुपया पाहून अर्थव्यवस्थेतील रोकड संकुचित करण्याच्या यापूर्वीच्या उपाययोजना मात्र माघारी घेतल्या जाण्याची शक्यता अधिक आहे.
गेल्या महिन्यात किरकोळ महागाई निर्देशांक कमी झाला असला तरी तो दुहेरी आकडय़ाच्या समीपच आहे; तर ऑगस्टमधीलच घाऊक निर्देशांक वधारता राहतानाच मध्यवर्ती बँकेच्या सहनशीलतेपुढे आहे. डॉ. राजन यांनी रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून रुपया ६ टक्क्यांनी अधिक भक्कम झाला आहे. मात्र जानेवारीपासूनची डॉलरच्या तुलनेतील त्याची घसरण १३.५ टक्क्यांची आहे. चलनाने ६८.८५ अशी व्यवहारातील ऐतिहासिक गटांगळी गेला महिनाअखेर नोंदविली आहे.
वाढती महागाई आणि स्थानिक चलनाची ही स्थिती कायम असताना देशाचा सकल उत्पादन दरही नजीकच्या तळापर्यंत गेला आहे. चालू आर्थिक वर्षांच्या तिमाहीत तो ४.४ टक्के असा गेल्या चार वर्षांच्या खालच्या पातळीवर, तर गेल्या आर्थिक वर्षांत तो ५ टक्के असा दशकातील नीचांक टप्प्यावर राहिला आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागारांनीही मार्च २०१४ अखेर विकास दर ५.३ टक्क्यांच्या पुढे जाणार नाही, अशी भीती व्यक्त केली आहे.
जुलैमध्ये औद्योगिक उत्पादनही नकारात्मक स्थितीतून प्रथमच डोके वर काढणारे राहिले आहे. असे असले तरी गेल्या काही कालावधीतील इंधन दरवाढ आणि प्रत्यक्ष मान्सूनचे परिणाम येत्या काही महिन्यांच्या आकडय़ांवर उमटण्याच्या चित्रामुळे तूर्त व्याजदर कपात होईल, असे दिसत नाही.
डॉ. राजन यांचे यंदाचे हे पहिले पतधोरण आहे, तर रिझव्‍‌र्ह बँकेचे ते मध्य तिमाही असेल. तमाम उद्योग क्षेत्रालाही यंदा व्याजदर कपातीची कमी अपेक्षा असली तरी शुक्रवारच्या धोरणात रोकड आकुंचन मागे घेतले जाईल, अशी आशा आहे. देशात विदेशी गुंतवणूक कायम राहण्यासाठी अमेरिकन चलनाची मोठी उपलब्धता करून देण्यात आली होती. ती आता कमी केली जाण्याची शक्यता आहे. आगमनातच रुपयाला भक्कम स्थान प्राप्त करून दिल्यानंतर राजन यांचे स्वागत करणारे उद्योग, बँक क्षेत्र यामुळे नाराज होण्याची अटकळ आहे.

अन्नधान्याच्या दरवाढीमुळे यंदा एकूण महागाई दर वाढला आहे. उद्योग क्षेत्राला मारक ठरणारे अडथळे आता दूर सारण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
– चंद्रजीत बॅनर्जी,
सीआयआयचे महासंचालक.

एकूण महागाईवरील अन्नधान्याच्या किंमतवाढीचा कायमचा दबाव चिंताजनक आहे. अन्नधान्याच्या दरांवर घातक परिणाम करणाऱ्या घटकांना प्राधान्याने हाताळले गेले पाहिजे.
– दिदारसिंग, फिक्कीचे महासचिव.

अर्थव्यवस्थेच्या विकासाला मारक महागाईचे आकडे आहेत. यामुळे उद्योग क्षेत्र वाढीपासून वंचित असून किंमतवाढीचा फटका सहन करत आहे.
– डी. एस. रावत,
असोचेमचे महासचिव.

Story img Loader