ज्या वनस्पती तूपनिर्मिती व्यवसायाच्या पायावर देशातील तिसऱ्या मोठय़ा आयटी कंपनीचा डोलारा उभा राहिला आहे तो ‘सनफ्लॉवर’ ब्रॅण्ड विप्रो कंपनीने कारगिल कंपनीला विकला आहे. मुळच्या अमेरिकेच्या कारगिलमार्फत सध्या भारतात जेमिनी, रथ या खाद्यतेल ब्रॅण्ड्सची विक्री होते. हा विक्री व्यवहार ५० कोटी रुपयांच्या घरात गेला असल्याचे सांगण्यात येते.
विप्रो समूहाचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांचे वडिल मोहम्मद हुसैन यांनी १९४९ मध्ये महाराष्ट्रातील खान्देशात अंमळनेर येथे ‘सनफ्लॉवर’ या वनस्पती तूप तसेच तेलनिर्मिती उद्योगाची स्थापना केली. यानंतर प्रेमजी यांच्या नेतृत्वाखाली समूहाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती साधली. त्याचबरोबर खाद्यपदार्थ, दिवे, फर्निचर, शाम्पू, पावडर निर्मिती क्षेत्रातही समूहाने शिरकाव केला. सध्या केवळ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातून विप्रो समूहाला ८० टक्के महसूल मिळतो. कंपनीने आता वेगाने वाढणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तू निर्मिती क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केले असून गेल्याच महिन्यात कंपीनीने हा व्यवसाय स्वतंत्र केला होता.
‘सनफ्लॉवर’ची निर्मिती झाल्यानंतर २००७ पासून पारंपारिक खाद्यतेल व्यवसाय निर्मितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न विप्रोमार्फत केला जात आहे. महसुलाच्या बाबत आज ‘सनफ्लॉवर’चा हिस्सा कंपनीच्या ग्राहकोपयोगी वस्तू निर्मिती क्षेत्रात अवघा एक टक्का आहे. महाराष्ट्रासह मध्यप्रदेशमध्ये या खाद्यपदार्थाला मोठी मागणी आहे. कंपनी इतर (स्वीकार) उत्पादने मात्र समूहाबरोबर कायम राहतील; तसेच या व्यवसायातील सर्व कर्मचारीही अन्य विभागात वळविले जातील, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. विप्रोच्या ग्राहकोपयोगी वस्तू विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल चुग तसेच कारगिर इंडियाचे अध्यक्ष सिरज चौधरी यांनी या ब्रॅण्ड हस्तांतर व्यवहाराच्या सहकार्याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

Story img Loader