डॉक्टरला पाहताच रुग्णही ठणठणीत व्हावा, असे चित्र बुधवारी पहायला मिळाले. बँकांचे नियमन करणाऱ्या सर्वोच्च संस्थेच्या प्रमुखपदाची सूत्रे नव्या अर्थतज्ज्ञाच्या हाती एकटवताच भारतीय चलनही भक्कम बनले. रिझव्‍‌र्ह बँकेच्या २३ व्या गव्हर्नरपदाचा कार्यभार वयाच्या ‘हाफ सेन्च्युरी’त घेणाऱ्या डॉ. रघुराम राजन यांचे बँकेच्या विविध डेप्युटी गव्हर्नर, बँकप्रमुखांसह सेन्सेक्स, रुपया या अर्थविकासाच्या प्रतिकांनीही स्वागत केले.
नव्या प्रमुखांचे स्वागत करण्यासाठी मध्यवर्ती बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरांचा पाच जणांचा ताफा राजन यांना आणण्यासाठी थेट मुख्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत गेला. मुख्यालय इमारतीच्या गव्हर्नरांच्या दालनात डी. सुब्बराव यांच्याकडून पदाची सूत्रे औपचारिकरित्या हाती घेतल्यानंतर विद्यमान अर्थव्यवस्था आव्हानांची असून आपले मुख्य धोरण महागाई नियंत्रणाबरोबरच देशाच्या वाढत्या विकास दराला अनुसरुन असेल, अशी ग्वाही राजन यांनी सायंकाळी प्रसारमाध्यमांना दिली.
सेन्सेक्स १८,५०० च्या पुढे
कालच्या सत्रातील मोठी आपटी बुधवारी भरून काढताना सेन्सेक्स पुन्हा १८,५०० च्या पुढे गेला. डॉलरच्या तुलनेत स्थिरावत चाललेले चलन पाहता गुंतवणूकदारांनी आघाडीच्या कंपनी समभागांमध्ये रस दाखविल्याने दिवसअखेर मुंबई निर्देशांकाने ३३३ अंशांची भर घातली. निफ्टीनेही आगेकूच राखत शतकी वाढीसह प्रमुख निर्देशांकाला ५,५०० नजीक नेऊन ठेवले आहे.
रुपया पुन्हा भक्कम बनला
चलनातील घसरण रोखण्यासाठी मंगळवारी उशिरा रिझव्‍‌र्ह बँकेने केलेल्या उपाययोजना परकी चलन व्यवहारावर परिणाम करत्या झाल्या. मध्यवर्ती बँकेचे नवे गव्हर्नर रुजू होण्याच्या पूर्वसंध्येलाच घेतलेल्या गृह कर्जाबाबतच्या निर्णयानंतर राजन यांनी कार्यभार हाती घेताच विदेशी कर्ज उभारणीचे नियम शिथील करताच स्थानिक चलन ५६ पैशांनी ६७.०७ पर्यंत भक्कम बनले.
पाऊल पडते पुढे..
कंपन्यांच्या परदेशातील प्रवर्तकांकडून घ्यावयाच्या कर्जाच्या अटी रिझव्‍‌र्ह बँकेने शिथील केल्या आहेत. डॉलरचा देशात ओघ वाढण्यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हे बदल करण्यात आली आहेत. गृहकर्ज हे प्रकल्पाप्रमाणे टप्प्या-टप्प्याने देण्याच्या निर्णय घेणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेचे हे दुसरे सकारात्मक पाऊल आहे. या आधीच्या, १ ऑगस्ट २००५ च्या परिपत्रकातील अटीमध्ये ताज्या पत्रकाने शिथील करण्यात आल्याचे मानण्यात येत. आता या कर्जाचा उपयोग सर्वसाधारण उपयोगासाठी करणे शक्य होणार आहे. या आधी या कर्जाचा उपयोग परदेशातील आधी ग्रहण व अन्य पत्रकात दिलेल्या कारणा व्यतिरिक्त करता येत नव्हता. कर्जदार कंपनीने कमीत कमी २५% समभाग धारण केले असावेत. कर्जाची परतफेड सात वर्षांपेक्षा कमी कालावधीत करता येणार नाही. पहिले सात वर्ष फक्त कर्जावरील व्याज देता येईल मुद्दलाची परतफेड सात वर्षांनंतरच शक्य होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा