गेल्या वर्षांत म्युच्युअल फंडांबाबत गुंतवणूकदारांच्या तक्रारीत कमालीची घट झाली आहे. २०१२-१३ आर्थिक वर्षांत एकूण तक्रारींच्या प्रमाणात ११,७९२ ने म्हणजे तब्बल २० टक्क्यांनी घट झाल्याची माहिती ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (अ‍ॅम्फी)’च्या ताज्या अहवालातून पुढे आली आहे. आघाडीच्या पाच म्युच्युअल फंडांपैकी तक्रारींमध्ये सर्वाधिक घट ही रिलायन्स म्युच्युअल फंडाबाबत दिसून आली आहे. तर या पाचांपैकी तक्रारींमध्ये वाढ केवळ आयसीआयसीआय म्युच्युअल फंडांबाबतीत अनुभवायास आली आहे.
गेल्या काही वर्षांत म्युच्युअल फंडांबाबत गुंतवणूकदारांचा हिरमोड झाल्याने, एकूण गुंतवणूक संख्या लक्षणीय घटली असताना याबाबतच्या तक्रारींमध्येही घट होणे फारसे आश्चर्यकारक नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. आघाडीच्या पाचही म्युच्युअल फंडांच्या एकूण गुंतवणूकदार संख्येत/ फोलिओमध्ये गेल्या वर्षांत एकत्रित १५ लाखांची घट झाली असून, हा आकडा २.६ कोटींवर रोडावला आहे. तथापि यापैकी लाभांश अथवा युनिट्स वॉरन्ट्स मिळाले नाहीत, लाभांश जमा होण्यात दिरंगाई, खाते विवरणात चुका, गुंतवणूकदाराचा तपशील चुकीचा, अतिरिक्त शुल्क आकारणी वगैरे तक्रारी दाखल करून असमाधान व्यक्त करणाऱ्यांची संख्याही आधीच्या वर्षांतील ५८,३१५ वरून ४६,५२२ अशी २० टक्क्यांनी घटली आहे.

Story img Loader