वेतनवाढीबाबत व्यवस्थापनाकडून चालढकल होत असल्याच्या निषेधार्थ येथील कामगार उपायुक्त कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषणास बसलेल्या महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र कामगार संघटनेच्या दोघा पदाधिकाऱ्यांना निलंबित केल्याने संतप्त कामगारांनी बुधवारपासून ‘टूल डाऊन’ आंदोलन सुरू केले. दरम्यान याप्रश्नी तोडगा निघावा म्हणून रात्री उशिरापर्यंत कामगार उपायुक्तांच्या कार्यालयात चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या.
नवीन वेतनवाढ करारासाठी संघटनेने ६ ऑगस्ट २०१२ रोजी व्यवस्थापनास मागण्यांचे निवेदन दिले होते. या आधीचा करार ५ फेब्रुवारी २०१३ रोजी संपल्यानंतरही व्यवस्थापनाकडून नवीन वेतनवाढ करारासंदर्भात ठोस चर्चा सुरू करण्यात आली नसल्याचा आक्षेप घेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ४ मार्चपासून कामगार उपायुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. या आधीही व्यवस्थापनाकडून करार करण्यास दिरंगाई झालेली असल्याने त्याची पुनरावृत्ती यावेळीही होत असल्याचा आरोप संघटनेने केला. उत्पादन वाढीशी निगडीत पगारवाढ हे व्यवस्थापनाचे धोरण असून वाढत्या महागाईच्या पाश्र्वभूमीवर केवळ उत्पादन वाढीचीच चर्चा आपणास मान्य नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे. व्यवस्थापनाच्या धोरणाविरुद्ध संघटनेने ११ मार्चपासून संपावर जाण्याचा इशाराही दिला होता.
दरम्यान कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रवीण शिंदे आणि उपाध्यक्ष अमोल सोनवणे या दोघांना मंगळवारी निलंबित करण्यात आले. ३ मार्च रोजी या दोघांनी चार तास उत्पादन बंद केले होते. त्यामुळे चौकशीसाठी त्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती महिंद्रचे महाव्यवस्थापक अनिल गोडबोले यांनी दिली. व्यवस्थापनाने दोन पदाधिकाऱ्यांना निलंबित केल्याने संतप्त झालेल्या कामगारांनी बुधवारपासून ‘टूल डाऊन’ आंदोलन सुरू केले. निलंबन मागे घेतले जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका संघटनेने घेतली. तर व्यवस्थापनाने आधी आंदोलन मागे घेण्याचा आग्रह धरला.
दिवसभरात व्यवस्थापन व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दोन वेळा चर्चा झाली. परंतु तोडगा निघत नसल्याने कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांच्या कार्यालयाकडे कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा वळविला. त्यानंतर सायंकाळी उशिरा कंपनी व्यवस्थापनाबरोबर उपायुक्तांची चर्चा सुरू होती.