परवा, बुधवारी ८ मार्च हा जागतिक महिला दिन. त्यातच महिला सक्षमीकरण या विषयावर खल करणारी तीन दिवसांची आंतरराष्ट्रीय परिषद मुंबईत महिनाअखेर होत आहे. भारतातील महिला उद्यमशीलता आणि या विषयाची आंतरराष्ट्रीय स्थिती याबाबत ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई’च्या प्रकल्प संचालक रुपा नाईक यांची मते –
८ मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे. या दिनाच्या निमित्ताने महिलांचे समाजातील, उद्योगातील स्थान यादृष्टीने चर्चा होते. हे दिनमहात्म्य झाले आहे काय?
तसे मुळीच नसावे. आज मुळात एकच दिवस हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करायची गरजच काय? असा एखादा दिवस अथवा कालावधीतच महिला कार्य करतात का? स्त्री ही नोकरी करणारी असो अथवा उद्योग, किंवा गृहिणी. तिचे कार्य अविरत आहे. मात्र या दिवसाच्या निमित्ताने तिच्याबाबतची सांगोपांग चर्चा विविध मंचावरून व्हायला हवी, असे मला वाटते. आज महिलांशी निगडित अनेक मुद्दय़ावर, समस्यांवर चर्चा होताना दिसत नाही. मला वाटते, विविध, विषयानुरूप असलेल्या व्यासपीठांवरून तरी स्त्रीविषयक चर्चा व्हायला हवी. त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर उत्तर शोधले जावे. स्त्रीघटकाशी संबंधित यंत्रणेलाही त्यात सहभागी करून घेणे आवश्यक आहे.
जागतिक आर्थिक परिषद आणि महिला सक्षमीकरण यांची सांगड कशी घालता येईल?
यासाठीच आम्ही येत्या २७ मार्चपासून तीन दिवसांची सहावी जागतिक आर्थिक परिषद आयोजित करत आहोत. ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई’ व ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या परिषदेत केवळ महिला सक्षमीकरण हा विषय केंद्रीत आहे. त्याच्याशी निगडित सर्व बाबींचा उहापोह यानिमित्ताने केला जाणार आहे.
तुम्ही उद्योग संघटनेचेही नेतृत्व करता? मग भारतातील महिला उद्योजकांना योग्य व मोठी बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीने काय पावले उचलली जात आहेत?
या परिषदेच्या सहभागाच्या माध्यमातून विविध २५ देशातील आघाडीच्या महिला सहभागी होत आहेत. यामध्ये बडय़ा उद्योजिकांपासून थेट राजकारणी, शासनकर्तेही आहेत. महिलांविषयी प्रोत्साहनपर पावले कशी उचलली जात आहेत हे यानिमित्ताने आपल्याला जागतिक चष्म्यातून दिसेल. शिवाय या महिला उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शनही करतील. वस्त्रोद्योग, हस्तकलासारख्या क्षेत्रातील भारतीय उद्योजिकांना अनेक आशियाई देशांमध्ये निर्यात संधी यानिमित्ताने उपलब्ध होईल.
या परिषदेत थेट करार मदार अथवा नेमकी उलाढाल किती होईल हे सांगता येईल का?
भारतातील व विदेशातील महिला उद्योजकांना एका मंचावर आणण्याबरोबरच त्यांच्या एक संपर्क यंत्रणा स्थापन करण्याचा या परिषदेचा उद्देश आहे. अमूक कोटींचे करार, तमूक देशाबरोबर सामंजस्य अशा घोषणा या मंचावर होणार नाहीत. मात्र भारतातील महिला उद्योजकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळविण्याचा मार्ग यातून निश्चितच दिसेल.
आज बँका, कंपन्या आदी ठिकाणी सर्वोच्चपदी महिला दिसतात. भारतातील महिला या आंतरराष्ट्रीय उद्योग जगतातही स्थिरावल्या आहेत. तुमच्या दृष्टीने याद्वारे महिला उद्यमशीलतेचे वर्तुळ पूर्ण झाले आहे का?
निश्चितच नाही. अजून खूप प्रवास बाकी आहे. अनेक कंपन्या, कौटुंबिक उद्योगात स्त्रीला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते आहे. मात्र माझ्या मते, ती अद्यापही पुरेशी नाही.
याबाबत कुठे कमी पडतो?
महिलांना ज्याप्रमाणे घर, समाजाचं पाठबळ आवश्यक आहे तसेच महिला उद्योजकांबाबत उद्योगस्नेही धोरणे असावीत. सरकारच्या विशिष्ट योजना खास या वर्गासाठी असाव्यात. मी तर म्हणेन की महिला उद्योजिकांसाठी असे अनेक ‘क्लस्टर’ तयार होण्याची गरज आहे. विविध सवलतींमध्ये महिला उद्योजकांना प्राधान्य देण्याबरोबरच त्यांना पूर्ण सहकार्य एकाच मंचाखाली कसे मिळेल, हे पहायला हवे.
महिलांचे सबलीकरण हा खूप मोठा विषय आहे. हा केवळ महिलांच्या उन्नतीचा विषय नसून संपूर्ण समाज, देश आणि जगताचाही आहे. कोणत्याही गोष्टींमध्ये महिलांचे सातत्य असते आणि नेतृत्व करण्याच्या बाबतीत त्या नेहमीच आघाडीवर असतात. त्यामुळेच महिलांच्या सक्षमीकरणाचे महत्त्व समजून घेण्याची वेळ आली आहे.