किरकोळ महागाई दरापाठोपाठ डिसेंबर महिन्यातील घाऊक महागाईतदेखील अल्पशी वाढ झाली आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित डिसेंबरमधील महागाई दर शून्य टक्क्य़ावरून वाढून ०.११ टक्के झाला आहे.
गेल्या महिन्यातील किरकोळ महागाईदेखील अल्प प्रमाणात वाढल्याची आकडेवारी जारी झाली. तर नोव्हेंबरमधील औद्योगिक उत्पादन दरातही सुधार दिसला. परिणामी रिझव्र्ह बँकेच्या येत्या महिन्यातील पतधोरणात व्याजदर कपातीची आशा पुन्हा एकदा उंचावली आहे.
नोव्हेंबरमधील शून्यावर असलेला महागाई दर यापूर्वी सलग पाच महिन्यात घसरता राहिला आहे. घाऊक किंमत निर्देशांक जूनपासून सतत घसरत होता. प्रामुख्याने अन्नधान्याच्या किमतीत वाढ झाल्याने यंदा तो शून्यापेक्षा उंचावला.
डिसेंबरमधील ५.२ टक्के अन्नधान्य महागाई दर गेल्या पाच महिन्याच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे. डाळी, भाज्या, फळे यातील दरवाढीमुळे आधीच्या महिन्याच्या तुलनेत यंदा अन्नधान्य महागाई दरदेखील वाढला आहे. त्याचबरोबर गहू, दूध यांच्या किमतीही वाढल्या आहेत. तर अंडी, मटण, मासे यांचे दर कमी झाले आहेत.
डिसेंबरमध्ये पेट्रोलच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ नोंदली गेली आहे. नोव्हेंबरमधील ९.९६ टक्क्य़ांवरून ते ११.९६ टक्क्य़ांवर आहेत. गेल्या महिन्यात प्राथमिक वस्तूंच्या किमती जवळपास एक टक्क्य़ावरून २.१७ टक्क्य़ांवर पोहोचल्या आहेत. इंधन व ऊर्जा क्षेत्रातही जवळपास दुप्पट किंमत वाढ नोंदली गेली आहे. नोव्हेंबरमधील ४.९१ टक्क्य़ांवरून या क्षेत्रातील महागाई दर ७.८२ टक्के झाला आहे.
रिझव्र्ह बँकेचे येणारे पतधोरण ३ फेब्रुवारीला जाहीर होईल. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्याकडून व्याजदर कपातीची आशा यापूर्वी व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलदरांमधील मोठा उतार हा सरकारसाठी अर्थव्यवस्थेवरील ताण हलका करणारा ठरत असून, यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये महागाई कमी होताना दिसू शकेल, असा अंदाज आहे.
व्याजदर कपातीचा पुन्हा तगादा..
निवडक प्रतिक्रिया
भारतीय अर्थव्यवस्थेतील भांडवल वर्तुळ पूर्ण करण्यासाठी आता तातडीने व्याजदर कमी करण्याची आवश्यकता आहे. महागाई दर नियंत्रणाखाली आल्याने रिझव्र्ह बँकेने येत्या पतधोरणात याबाबत ठोस निर्णय घ्यावा.
-ज्योत्स्ना सुरी, अध्यक्ष, फिक्की
डिसेंबरमधील घाऊक तसेच किरकोळ महागाईतील उतार हा त्यामानाने अल्पसा आहे. कच्च्या तेलाच्या दरातील मोठी घसरण ही महागाईच्या आगामी अंदाजासाठी महत्त्वाची ठरेल. त्याचबरोबर इंधन अनुदान आणि चालू खात्यातील तुटीवरील त्याचा परिणामही पाहणे उत्सुकतेचे असेल. रिझव्र्ह बँक केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी व्याजदर कमी करेल, असे वाटत नाही.
-अदिती नायर, वरिष्ठ अर्थतज्ज्ञ, इक्रा
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलातील दर घसरण आणि रिझव्र्ह बँकेकडून येत्या वर्षभरात एक टक्क्य़ापर्यंत होणारी व्याजदर कपात हे महागाई आणखी कमी करण्यास कारणीभूत ठरू शकते. आणि अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी हेच महत्त्वाचे असेल.
-दिनेश ठक्कर, अध्यक्ष, एंजल ब्रोकिंग
सध्याची महागाई दरस्थिती ही रिझव्र्ह बँकेचे लक्ष महागाईकेंद्रितवरून हटविणारी आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि उद्योगाच्या उभारणीसाठी आता व्याजदर कपात अपरिहार्य ठरली आहे.
-चंद्रजीत बॅनर्जी, महासंचालक, सीआयआय