मंगळवारी राज्यसभेत अर्थव्यवस्थेवर टिप्पणी करताना अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांची ‘उपचार ठाऊक नसलेला डॉक्टर’ अशी संभावना त्यांचेच पूर्वसुरी आणि राज्यसभेतील भाजपचे नेते यशवंत सिन्हा यांनी केली.
देशात सरकार अस्तित्वात आहे का, असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे. या देशाने आजपर्यंत इतका असहिष्णू अर्थमंत्री पाहिला नाही. चिदम्बरम यांची जागा अर्थमंत्रालयात नसून कोर्टात वकिलांच्या चेंबरमध्ये आहे, असा टोला लगावत सिन्हा यांनी विद्यमान यूपीए सरकारातील सर्वाधिक कार्यप्रवण व धडाडीचे म्हणून नावाजले जात असलेल्या चिदम्बरम यांच्यावर टीकेची झोड उठवली.  
रुपयातील इतकी मोठी घसरगुंडी कुणालाच अपेक्षित नव्हती, परंतु सरकार फक्त बघ्याच्या भूमिकेत राहिले. सरकारच्या धोरण लकव्याचेच हे प्रताप आहेत. सरकारने अर्थव्यवस्थेचे नियंत्रण गमावल्यामुळे त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असे सिन्हा यांनी भाषणात सांगितले. २००८ पासून महागाईचा दर १० टक्क्यांवर कायम आहे. सरकारने महागाई नियंत्रित करण्यासाठी काहीही उपाय केले नाहीत.
अर्थव्यवस्थेत जर मोठी वित्तीय तूट असेल तर महागाईचा दर चढाच राहतो आणि महागाईचा दर चढा असल्यामुळे व्याजाचे दर खाली येत नाहीत, असे साधे अर्थशास्त्रही लक्षात घेतले जाऊ नये, असा त्यांनी टोमणा लगावला. सरकार रिझव्‍‌र्ह बँकेला दोष देत आहे. आज रिझव्‍‌र्ह बँकेच्या धोरणामुळे महागाई थोडी तरी आटोक्यात राहिली, असा त्यांनी शेरा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा