नवे वर्ष बँकिंग क्षेत्र, गृहनिर्माण-बांधकाम, रिटेल आणि आवर्तन पूर्ण होऊन उलटफेर या अर्थाने तेल कंपन्या, विमान कंपन्यांसाठी तेजीचे राहील. प्रारंभिक वाटचाल पाहता स्मॉल व मिडकॅपमागील साडेसाती सरलेल्या वर्षांसह संपुष्टात आली आहे. २०१४ साल या भाग प्रकारांसाठी तेजी आवर्तनाचे असेल काय?
नवे वर्ष घेऊन आलेली नवलाई म्हणजे गेल्या संपूर्ण वर्षांत सपाटून मार खाणाऱ्या मिड-कॅप, स्मॉल-कॅप शेअर्समध्ये तेजीची झुळूक दिसत आहे. वर्षांच्या पहिल्या दिवसापासून साधारण अपेक्षेच्या विपरीत, विदेशी वित्तसंस्था (एफआयआय)नी खरेदी केली, तर देशी फंड, वित्तसंस्थांनी नफा कमावणारी विक्री केली. परिणामी वर्षांरंभी सेन्सेक्स, निफ्टी प्रमुख निर्देशांकात घसरण दिसली असली तरी स्मॉलकॅप, मिडकॅप निर्देशांक कमाईसह बंद झाले.
विशेषत: बांधकाम क्षेत्रातील डीबी रिअ‍ॅल्टी, अशोका बिल्डकॉन, गॅमन इन्फ्रा, जे. कुमार, गोदरेज प्रॉपर्टीज् या २०१३ मध्ये रया गमावलेल्या समभागांना नवे वर्ष पावलेले दिसत आहे. अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या द्रवतापूरक धोरणाला मुरड घालण्याच्या पावलानंतर ‘एफआयआय’कडून खरेदी सुरू राहणे आणि त्यांनी स्मॉल व मिडकॅपच्या दिशेने वळविलेला होरा खूपच आश्वासक आहे. एफआयआयचा ताजा कल पाहता आघाडीचे दलाल-ट्रेडर्सनीही या समभागांकडे लक्ष वळविले आहे. आज ना उद्या खरेदी किमतीला शेअरचा भाव येईल या आशेने कैक वर्षे बाळगून ठेवलेल्या छोटय़ा गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलियोला अखेर बरे दिवस दिसतील. अनेकांना बाहेर पडायची अथवा काहीसा नफा पदरी पाडून घेण्याची संधी नव्या वर्षांच्या पहिल्या काही दिवसांनीच दिली आहे.
स्मॉल व मिडकॅपचे भाव ज्या गतीने ओसरतात, त्याचप्रमाणे तेजीच्या सुकाळात त्याच गतीने ते नि:संशय वाढतही जातात. वर उल्लेख आलेल्या बांधकाम कंपन्यांप्रमाणे मध्यम आकाराच्या बँका- युको, फेडरल, डीसीबी, लक्ष्मी विलास बँक या शेअर्समध्ये उलाढाल वाढल्याचे दिसून येत आहे. याच क्रमात डिव्हीज् लॅब, ग्लॅक्सो स्मिथक्लाइन, कावेरी सीड्स, अपोलो टायर्स, बालकृष्ण इंडस्ट्रीज, सिएट, सीएमसी, डीआयसी इंडिया, एस्सेल कॉर्प, फिनोलेक्स इंडस्ट्रीज, जेएमटी ऑटो नवीन उच्चांक बनवीत आहेत. गेल्या वर्षांत बाजारात ‘आयपीओ’द्वारे दाखल झालेल्या मोजक्या कंपन्यांपैकी एक जस्ट डायलने अल्पावधीत १५०० च्या वर मजलही मारली आहे. त्या उलट बॉम्बे रेयॉन, बँक ऑफ महाराष्ट्रचा भाव लोळण घेत चालले आहे.
निवडणूक वर्ष असल्याने यंदा फेब्रुवारीअखेर अर्थसंकल्प मांडला जाणार नाही. त्यामुळे बाजार घसरणीचे मोठे कारण दिसून येत नाही. तोवर तरी तेजीला विराम नाही, असे खात्रीने म्हणता येईल.
शिफारस:
दीर्घकालीन खरेदीसाठी इंडिया ग्लायकॉल्स लि. (बीएसई भाव: १०४.३०), तर बाजाराचा सद्य काल पाहता ब्रुक्स लॅबॉरेटरीज लि. (बीएसई भाव: १९.२५) मध्ये मध्यमकालीन गुंतवणूक लाभदायी दिसून येते.

Story img Loader