खासगी क्षेत्रातील येस बँकेने गुरुवार, १ ऑगस्टपासून ताबडतोबीने ठेवी तसेच कर्जावरील व्याजाच्या दरात पाव ते अर्धा टक्क्यांच्या वाढीची बुधवारी घोषणा केली. रुपयाला सावरण्यासाठी अर्थव्यस्थेतील रोकड शोषणाऱ्या चालू महिन्यात दोनदा योजलेल्या कठोर उपाययोजना आणखी काही सुरू ठेवत, रिझव्र्ह बँकेने मंगळवारी जाहीर केलेले व्याजाचे दर जैसे थे ठेवणाऱ्या पतधोरणाचे बँकिंग व्यवस्थेवरील विपरित पडसादाची पहिली नांदी म्हणून व्याजदर वाढीकडे पाहता येईल.
येस बँकेने गुरुवारपासून (१ ऑगस्ट) आपला आधार दर (किमान ऋण दर) पाव टक्क्याने उंचावून १०.७५ टक्के केला आहे. यामुळे बँकेचा विविध मुदत ठेवींवरील तसेच कर्जावरील व्याजदर पाव ते अर्धा टक्क्यांनी वाढणार आहे. रुपयाला सावरण्यासाठी अल्पावधीसाठी निधीची उचल रिझव्र्ह बँकेने महाग करून, बँकिंग व्यवस्थेतील रोख तरलतेला मारक ठरतील अशा केलेल्या उपाययोजनांचा खासगी क्षेत्रातील इंडसइंड बँक आणि येस बँक यांना विपरीत परिणाम सोसावे लागतील, असा विश्लेषकांनी यापूर्वीच कयास व्यक्त केला होता. तर रिझव्र्ह बँकेचे उपाय आणखी काही काळ लांबल्यास सर्वच वाणिज्य बँकांकडून कर्जे महागण्याची शक्यताही विश्लेषक वर्तवीत आहेत.
तथापि रिझव्र्ह बँकेने काल तिमाही पतधोरणाच्या अवलोकनात चलनात स्थिरता आल्यानंतर पंधरवडय़ापूर्वी योजलेल्या उपाययोजना मागे घेतल्या जातील अशी ग्वाही दिली आहे. परंतु त्या किती काळ सुरू राहतील, हे पाहिले जाईल, असे नमूद करून बहुतांश वाणिज्य बँकांनी किमान महिनाभर तरी व्याजाचे दर आहे त्या पातळीवर राहतील, असे स्पष्ट केले आहे.
बँकिंग व्यवस्थेत रोखीची टंचाई दीर्घ काळ कायम राहिल्यास, बँकांना ठेवींवरील व्याजाचे दर वाढवून कर्ज वितरणासाठी आवश्यक निधी मिळवावा लागेल. मात्र यातून पर्यायाने कर्जावरील व्याजाचे दर वाढण्याचीच शक्यता असून, ते आधीच मंदीसदृश अर्थव्यवस्थेसाठी ही बाब मारकच ठरेल, असा विश्लेषकांचा कयास आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा