गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या Zomato IPO विक्रीचा पहिला दिवस खऱ्या अर्थाने हाऊसफुल्ल ठरला! पहिल्याच दिवशी झोमॅटोच्या आयपीओची १.०७ पटीने विक्री झाली आहे. आजपासून म्हणजेच १४ जुलै ते १६ जुलै या कालावधीमध्ये हे समभाग विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. मात्र, आज पहिल्याच दिवशी झोमॅटोच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा तुफान प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचं प्रमण सर्वाधिक होतं. एकूण ९ हजार ३७५ कोटींच्या या समभागांचा आज विकण्यात आलेल्या हिश्यातून कंपनीने अँकर इन्व्हेस्टर्सकडून तब्बल ४ हजार २०० कोटींची रक्कम उभी केली आहे. अजूनही गुंतवणूकदारांना Zomato IPO साठी बोली लावता येणार असून त्यासाठी ७२ रुपये ते ७६ रुपये प्रति समभाग अशी किंमत ठरवून देण्यात आली आहे.

कुणी किती केली खरेदी?

झोमॅटोने आज बाजारात विक्रीसाठी उतरवलेल्या समभागांपैकी किरकोळ गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. मात्र, त्यासोबतच क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स अर्थात QIB साठी राखीव ठेवण्यात आलेल्या समभागांपैकी ९८ टक्के समभागांची विक्री झाली असून नॉन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स अर्थात NII कडून त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या समभागांपैकी १२ टक्के समभागांसाठी बोली लावण्यात आली आहे. खुद्द झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या भागापैकी १८ टक्के खरेदी केले आहेत. झोमॅटोच्या एकूण समभागांपैकी ७५ टक्के समभाग QIB साठी, १५ टक्के समभाग NII साठी तर १० टक्के समभाग किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

Zomato ला येत्या ५ वर्षांत मोठी संधी!

दरम्यान, Zomato च्या समभाग विक्रीसंदर्भात आयसीआयसीआय डायरेक्टच्या हवाल्याने फायनान्शिअल एक्स्प्रेसनं वृत्त दिलं आहे. ICICI Direct च्या मते, झोमॅटोमध्ये मोठी वाढ होण्याची खूप क्षमता आहे. झोमॅटो एक कंपनी म्हणून अनेक प्रकारे वाढत आणि विस्तारत आहे. भारतातील अन्न पुरवठा बाजारपेठ येत्या ५ वर्षांमध्ये तब्बल ७.७ लाख कोटींपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे झोमॅटोला यामध्ये खूप चांगली संधी आहे.

Zomato IPO : बहुप्रतीक्षित आयपीओ विक्रीसाठी उपलब्ध

कंपनीच्या अँकर इनव्हेस्टर्सच्या यादीत अनेक बड्या कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये टायगर ग्लोबल इनव्हेसमेंट फंड, ब्लॅकरॉक, फिडेलीटी, जेपी मॉर्गन, मॉर्गन स्टॅनली, टी रोवी प्राइज, कॅनडा पेन्शन प्लॅन इनव्हेसमेंट बोर्ड, सिंगापूर सरकार, एसबीआय म्युच्युअल फंड, अ‍ॅक्सेस बँक, कोटक म्युच्यूअल फंड, युटीआय म्युच्यूअल फंड, मोतीलाल ओस्वाल एएमसी, एचडीएफसी म्युच्यूअल फंड, आयसीसी प्रेडेन्शीयल म्युच्यूअल फंड, टाटा म्युच्यूअल फंड, ग्लोड्मन सॅशे इंडिया, आबुधाबी इनव्हेसमेंट अथॉरिटी, प्रॅकलिन टेम्पल्टन, एचएसबीसी अ‍ॅसेट मॅनेजमेंट (इंडिया) यासारख्या कंपन्यांच्या या यादीत समावेश आहे.

Story img Loader