आपण आजपर्यंत करीत असलेली कामे उद्या यंत्रे करणार आहेत व त्यामुळे उद्या निर्माण होणाऱ्या रोजगारांची तयारी आज करणे जरुरी आहे. भारताने आज त्या नवीन क्रांतीला सज्ज व्हायला पाहिजे. ‘भारतात बनवा’ या घोषणेची अंमलबजावणी करताना तंत्रज्ञानात होणारे बदल लक्षात घेणे जरुरी आहे.

गेल्या शतकातील औद्योगिक क्रांतीने जगाच्या अर्थकारणाचे चित्र संपूर्णपणे बदलून टाकले. वाफेच्या इंजिनापासून सुरू झालेल्या या तंत्रज्ञानाने उत्पादन क्षेत्रापासून शेती व्यवसायापर्यंत सर्वच क्षेत्रांत आमूलाग्र बदल आणले. अगदी १७६० सालापासून सुरू झालेल्या या क्रांतिपर्वाने २०व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत अर्थकारणातील आमूलाग्र बदल घडवून आणले. कापड उद्योग, लोहमार्ग वाहतूक, पोलाद उत्पादन येथपासून घडत गेलेले बदल खाण उद्योग, ऊर्जा उद्योग या सर्वच क्षेत्रांत पसरत गेले. मोठमोठे कारखाने उभे राहिले. लोकांना रोजगार मिळाले, शहरीकरणाच्या प्रक्रियेला वेग येत गेला आणि या सर्वाचाच देशाच्या अर्थकारण व समाजकारण यांवर सखोल परिणाम झाला. या औद्योगिक क्रांतीने जशी सुबत्ता आणली तसेच त्याचे वाईट परिणामही आले. शहरीकरण झाले, पण शहरांचे बकालीकरणही झाले. ऊर्जेच्या भरमसाट व अयोग्य वापराने पर्यावरणावर अतिशय घातक परिणाम होऊन दूषित खेडय़ापाडय़ांतून शहरात काम व पैशाच्या आशेने आलेल्या माणसांचे हाल झाले. खेडी ओस पडत चालली व शहरातील वाढत्या गर्दीने आयुष्य बरबाद झाले. भारतात गेल्या ५० वर्षांत हेच चित्र दिसले, पण जगभरातील बहुतेक देश हे या दुष्टचक्रातून गेलेले आढळतात. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी होण्याऐवजी वाढतच गेली. याच वेदनेतून समाजवाद, साम्यवाद अशा विचारसरणी येऊन भांडवलशाही व्यवस्थेवर कोरडे ओढले जाऊ लागले. या बदलणाऱ्या अर्थकारणाने जग विभागले जाऊ लागले. ही सर्व पहिल्या व दुसऱ्या तंत्रज्ञान क्रांतीची मेहरबानी आहे! पण एक मात्र खरे की तंत्रज्ञानाने आणलेल्या या औद्योगिक क्रांतीने तेव्हा उत्पादकता भरपूर प्रमाणात वाढवली. रोजगार वाढवले, मालाची मागणी वाढवली, सेवांची गुणवत्ता वाढवली. आपण गेल्या ५० वर्षांत भारतात झालेल्या पोलाद, मोटार उद्योग, वाहतूक सेवा इत्यादींतील बदल बघितले तर १०० वर्षांपूर्वी पाश्चिमात्य देशात झालेल्या बदलांचे चित्र डोळ्यांसमोर आणता येते. तेव्हाच्या औद्योगिक क्रांतीनंतर झालेल्या परिणामांचे बरेच मोजमापन झाले आहे. असे मोजमाप करताना साधारणत: चार बाबींचा विचार केला जातो. देशातील वाढते दरडोई उत्पादन, कामगारांची उत्पादकता, रोजगारनिर्मिती आणि सरासरी घरटी उत्पन्न. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या तीन दशकांच्या काळात अमेरिकन अर्थव्यवस्थेत या चारही बाबींमध्ये उत्तम प्रगती झाली व म्हणूनच अमेरिकन अर्थव्यवस्था व समाजव्यवस्था जगात पूर्णपणे प्रबळ सत्ता झाली.
प्रथमत: पारतंत्र्यात असलेल्या भारताने आणि मग अंगीकारलेल्या समाजवादी अर्थकारणाने या क्रांतीची बस चुकवली! साम्यवादाच्या पाठी लागलेल्या चीननेही ही बस चुकवली, चीनच्या लक्षात ही चूक आली व त्याच साम्यवादी व्यवस्थेचा फायदा घेत त्यांनी स्वत:च्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणले. गेल्या दोन दशकांतील चीनची प्रगती ही लक्षणीय आहे. आज अमेरिकन अर्थव्यवस्थेला स्पर्धा करू शकेल अशी तेवढीच एक अर्थव्यवस्था डोळ्यांसमोर दिसते आहे. भारतापेक्षा तिपटीने मोठी असणारी अर्थव्यवस्था अमेरिकेच्या तृतीयांश असली तरी ती ज्या वेगाने वाढते आहे ते पाहता या क्रांतीचा उशिरा झालेला संपर्क चीनला अमेरिकेचा स्पर्धक बनवील. अर्थात ही प्रगती शाश्वत ठरावी असे वाटत असेल तर चीननेही अर्थव्यवस्थेच्या या चार परिमाणांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. भारतात मात्र गेल्या वर्षभरात तेवढय़ा घोषणा झाल्या, त्या प्रत्यक्षात उतरवण्याचा वेग बेचैन करणारा आहे. औद्योगिक किंवा गेल्या दशकातील तंत्रज्ञान क्रांती ही वेगळी होती व आजची तंत्रज्ञान क्रांती वेगळी आहे. या वेगळेपणाचे मर्म जाणून घेणे गरजेचे आहे. ते न कळता जर जुन्या क्रांतीपासून मिळालेले धडे परत गिरवले तर यशापेक्षा अपयशाची जास्त खात्री देता येईल.
तेव्हाच्या तंत्रज्ञान क्रांतीमुळे ज्या यंत्रांची निर्मिती झाली त्या बहुतेक सर्व यंत्रांनी माणसाच्या शारीरिक कष्टांची जागा घेतली. उदाहरणार्थ- वजन उचलण्याच्या यारीने १०० माणसांची संपूर्ण दिवसाची मेहनत एका तासात उरकण्याची किमया केली. माल उत्पादन, खाण उद्योग, वाहतूक या सर्वच क्षेत्रांत माणसाच्या मेहनतीची जागा लहान-मोठय़ा यंत्रांनी घेतली. साध्या जमिनीत खड्डा करायला किंवा विहीर खणायला जेवढी माणसे किंवा दिवस लागायचे, यंत्रांनी तेच काम काही तासांत उरकून उत्पादकता कमालीने वाढवली. यामुळे बिनचूक मोठय़ा प्रमाणात उत्पादन होण्यास व त्याचा परिणाम उत्पादनाच्या खर्चावर होऊन त्या त्या मालाचा मोठय़ा प्रमाणावर पुरवठा करणे शक्य होऊ लागले. पण या प्रत्येक यंत्राबरोबर ते चालवणारा माणूस तेथे असणे जरुरीचे होते. आजची जी तंत्रज्ञान क्रांती होते आहे, त्यात माणसाच्या मेहनतीची जागा यंत्रे घेत असतानाच बुद्धीचीही जागा घेत आहेत. संगणक जेव्हा ८०/९० च्या दशकात घराघरात पोहोचले, त्या वेळी संगणक कितीही वेगवान असला तरी त्याला स्वत:ची बुद्धी नाही व आपण जे सांगू, जी आज्ञावली पुरवू त्यानुसार काम करणारा तो माणसाचा गुलाम आहे, अशी हेटाळणीरूप भाषा सर्वच जण वापरताना दिसत होते. पण या डिजिटल क्रांतीच्या ओघात आता येणारी यंत्रे, यंत्रमानव हे माणसांचीच जागा घेत आहेत. या क्रांतीचा पहिला परिणाम जो तुम्हा-आम्हा सर्वानाच दिसेल तो म्हणजे चालकाशिवाय चालणारी गाडी आता केवळ कल्पनेतच नाही तर प्रत्यक्षात रस्त्यावर धावताना दिसणार आहे. आज जेव्हा संगणकीय यंत्र व माणूस बरोबरीने कामे करतील तेव्हा ऐन वेळी निर्णय कोण घेईल हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पूर्वीच्या क्रांतीतून आलेल्या व्यवस्थेत अशा वेळी माणूसच निर्णय घेईल, हे अध्याहृत होते. विमान कितीही संगणकाने हाकले तरी आणीबाणीच्या परिस्थितीत तेथील दोन चालक निर्णय घेऊन सर्व चलनयंत्रणा स्वत:च्या ताब्यात घेतील, अशी खात्री प्रत्येक विमान प्रवाशाला होती व म्हणूनच तो निर्धास्त होता. पण गेल्या काही वर्षांतील तंत्रज्ञान प्रगतीमुळे आज परिस्थिती वेगळी आहे. आज चालकरहित विमाने केवळ युद्धात भाग घेऊन शत्रूवर हल्ला करीत नाहीत तर व्यावसायिक विमानातही आणीबाणीच्या काळात सूक्ष्म सेकंदात अचूक निर्णय घेणारी संगणक प्रणाली विमानामध्ये बसवली जात आहे. असे निर्णय घेताना लागणाऱ्या आज्ञावली तयार होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेनुसार त्यांची आखणी केली जात आहे. अगदी वैद्यकशास्त्रातील एखाद्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेपासून, विमान, गाडी चालकापर्यंत ही नवीन यंत्रे माणसाची मेहनतच नाही तर बौद्धिक क्षमतेची जागा उत्तम तऱ्हेने घेऊ लागणार आहे. उत्पादन उद्योग, सेवा उद्योग यांच्यावर या नवीन क्रांतीमुळे होणारा हा परिणाम सर्व अर्थव्यवस्थेवर व समाजव्यवस्थेवर खोलवर परिणाम करणारा ठरणार आहे.
आजच्या औद्योगिक व तंत्रज्ञान क्रांतीने अकुशल कामगारांची गरज जवळजवळ संपुष्टात आणली आहे. पण आजही कुशल कामगारांना रोजगाराची हमी आहे! उद्याच्या तंत्रज्ञानाने कुशल कामगारांची गरजही कमी होत जाईल. वर दिलेल्या उदाहरणांप्रमाणे विमानचालकांची गरजच राहणार नाही! डिजिटल क्रांतीचे हे बदलते स्वरूप लक्षात घेणे गरजेचे आहे. परवाच एका मोठय़ा भारतीय अर्थसंस्थेच्या चालकांशी बोलताना मी कल्पना मांडली की नवोद्योजकांसाठी तुम्ही स्वतंत्र शाखा काढणे जरुरी आहे. या कल्पनेचा मी विस्तारही केला. पहिलाच प्रश्न एका संचालकांनी विचारला, कुठे काढायची ही शाखा? मुंबई की बंगळुरूला? माझ्या मते हा प्रश्नच निर्थक आहे. या नवीन तंत्रज्ञान क्रांतीच्या युगात तुम्ही ‘आभासी शाखा’ काढणे गरजेचे आहे. दूरसंचार व संगणकीय महाजाल यावर ही शाखा असणे गरजेचे आहे. म्हणजे अगदी मुंबई-बंगळुरूपासून गडचिरोली-चिकमंगळूर-कोहोमामधील नवोद्योजक या शाखेबरोबर व्यवहार करू शकेल. आजच्या आणि उद्याच्या तंत्रज्ञान क्रांतीमध्ये हे व असे बदल घडून येणार आहेत. अमेरिकेसारख्या अर्थव्यवस्थेत या नवीन बदलांचे परिणाम जाणवू लागले आहेत. औद्योगिक उत्पादकता वाढते आहे, पण लोकांची घरटी आमदनी मात्र कमी होत आहे. अर्थव्यवस्था वाढते आहे, पण रोजगाराचे प्रमाण मात्र वाढताना दिसत नाही. भूगोल इतिहासजमा होत चालला आहे. पण गरीब-श्रीमंतीतील दरी आणखीनच वाढताना दिसत आहे. तुम्ही केवळ कुशल कामगार आहात म्हणून तुम्हाला रोजगार मिळणार नाही तर आता तुम्हाला ‘अतिकुशल’ कामगार म्हणून शिक्षण घेणे जरुरी आहे. जगातील सर्वच प्रगत देशांत या उद्याच्या तंत्रज्ञान क्रांतीमुळे हे बदल घडणार आहेत. त्या बदलांची व त्यांच्या परिणामांची तीव्रता ही त्या त्या देशातील सामाजिक परिस्थितीप्रमाणे वेगवेगळी असेल. पण सर्वच देशांतील मध्यमवर्गीय समाजावर या बदलांचे जास्तीत जास्त परिणाम झालेले असतील. आपण आजपर्यंत करीत असलेली कामे उद्या यंत्रे करणार आहेत व त्यामुळे उद्या निर्माण होणाऱ्या रोजगारांची तयारी आज करणे जरुरी आहे. भारत आज त्या नवीन क्रांतीला सज्ज व्हायला पाहिजे. ‘भारतात बनवा’ या घोषणेची अंमलबजावणी करताना हे होणारे बदल लक्षात घेणे जरुरी आहे. कारण या नवीन तंत्रज्ञानाद्वारे उभे राहणारे कारखाने वेगळ्या कौशल्याला रोजगार देणार आहेत. तंत्रज्ञानाचा एक नवीन वर्ग तयार करणार आहेत. आपण सर्वानीच याची दखल घेऊन त्या दृष्टीने तयारी करणे जरुरी आहे. पण आज तरी आपला सर्वसाधारण समाज हा धर्म, मांसाहार, भाषण-लेखनस्वातंत्र्य असल्या वादांवर लक्ष केंद्रित करून आपला वेळ फुकट घालवतो आहे. अगदी प्रसारमाध्यमे, राजकारणीसुद्धा याच विषयांना हवा देत ज्वलंत ठेवत आहेत. या सगळ्या गोंधळात उद्याच्या या तंत्रज्ञान क्रांतीच्या बदलांकडे दुर्लक्ष केले तर येणारी परिस्थिती फारच बिकट असेल!

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट

लेखक अर्थ-उद्योग धोरणांची दिशा ठरवणाऱ्या अनेक संस्था-संघटनांचे पदाधिकारी असून एका उद्योजकीय सल्ला-कंपनीचे अध्यक्ष आहेत. त्यांचा ई-मेल
deepak.ghaisas@gencoval.com

Story img Loader