आशीष ठाकूर

सेन्सेक्सवर आतापर्यंत १२,८८५ अंशांची (४२,२७३ ते २९,३८८) घसरण झाली आहे.  आणि निफ्टीवर ३,८७५ अंशांची (१२,४३० ते ८,५५५) घसरण झाली आहे. उच्चांकापासून ३० टक्क्यांची घसरण ही कामकाज झालेल्या अवघ्या ४० दिवसांच्या आत कुठेही उसंत, भरीव सुधारणा न होता अल्पावधीत घडली. हेच मोठय़ा चिंतेचे कारण आहे.

निफ्टीला आर्त साद घालणाऱ्या ‘आता तरी येशील का?’ कवितेच्या ओळीने लेखाची सुरुवात करावीशी वाटली. परिस्थितीनेच असे अविश्वसनीय वळण घेतले आहे. सुधीर मोघे यांचं हे अजरामर गीत. ‘सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का’ या गीतात प्रियकराच्या विरहाची भावना कवीला अभिप्रेत आहे, तर आज भांडवली बाजारात गुंतवणूकदारदेखील तेजीपासून दुरावलेल्या निर्देशांकांना अशी साद घालत आहेत.. ‘तेजीच्या मंद झाल्या तारका, निफ्टी आता तरी तू तेजी घेऊन येशील का’ अशी ती साद!

विसरणे अशक्य बनलेल्या तरी लवकर विस्मरण व्हावे वाटणाऱ्या आठवडय़ाच्या वाटचालीचा आता वेध घेऊया.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ३४,१०३.४८

निफ्टी : ९,९५५.२०

या स्तंभातील २३ डिसेंबर २०१९च्या लेखाचे शीर्षक होते – ‘अनर्थ टाळायचा तर’. त्या लेखात महात्मा जोतिबा फुले यांच्या ‘विद्येविना मती गेली.. गतीविना वित्त गेले’ या क्रांतिकारी विचारांचा आधार घेतला होता.

हे क्रांतिकारी विचार आमच्या भांडवली बाजारालादेखील तंतोतंत लागू पडतात. भांडवली बाजारातील सगळे आर्थिक अनर्थ हे केवळ आणि केवळ तेजीत समभाग विकले नाहीत म्हणून घडतात. त्यामुळे समभाग विकण्याचा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून ‘फेबुनासी कालमापन पद्धती’चा आधार घेतला गेला. त्यानुसार निफ्टीचे जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात १२,३०० च्या उच्चांकाचे भाकीत वर्तविले होते. या सर्वामागे गुंतवणूकदारांची मानसिकता तयार करणे आणि समभाग लक्ष्यासमीप आल्यावर गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीसाठी ‘कुछ तो करोना’ कृती अपेक्षित होती. पण भलत्याच करोनाशी गाठ पडली. दुर्दैवाने त्या लेखातील दोन शब्दांची आज प्रचीती आली. त्यातील पहिला शब्द ‘अनर्थ’. सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी निर्देशांकावर दहा टक्क्यांचे खालचे सर्किट लागून अनर्थ झाला आणि यात गुंतवणूकदारांचे फार मोठय़ा प्रमाणात ‘वित्त गेले.’

आज प्रांजळपणे मान्य केले पाहिजे की,  उच्चांकाचे वरचे लक्ष्य जरी तारीखवार काढले होते, त्यापुढे घसरणदेखील अपेक्षित असल्याचे सुचविले गेले, पण सध्याच्या घातक उताराचा वेग आणि दहशत ही गेल्या तीस वर्षांत प्रथमच दाहक अनुभव देणारी होती. त्यामुळे येणाऱ्या दिवसात या बाजारात तेजीची धारणा कायम आहे, की बाजार मंदीच्या गत्रेत सापडला आहे, याच्या स्पष्टीकरणासाठी आपण गेल्या तीस वर्षांत जे मंदीचे टप्पे आले त्या इतिहासाचे विस्ताराने विवेचन करूया.

तीस वर्षांतील मंदीचे टप्पे

*  सन १९८९ मध्ये पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील अर्थमंत्री मधु दंडवते यांनी अर्थसंकल्प सादर केल्यावर मुंबई शेअर बाजार निर्देशांक ७६० अंशांवरून ऑक्टोबर १९९० पर्यंत १,६०० अंशांवर झेपावला. नंतर इराकने कुवैतवर आक्रमण केले आणि बाजार कोसळला. मुंबई शेअर बाजार निर्देशांक १,६०० वरून फेब्रुवारी १९९१ ला ९५० अंशांपर्यंत घसरला. उच्चांकापासून ३८ टक्क्यांची ही घसरण चार महिन्यांत झाली.

*  पुढे १९९१ साली पंतप्रधान नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थसंकल्प सादर केल्यावर मुंबई शेअर बाजार निर्देशांक १,९०० वरून एप्रिल १९९२ पर्यंत ४,५४६ वर झेपावला. त्यानंतर हर्षद मेहताचा शेअर घोटाळा बाहेर आला आणि मुंबई शेअर बाजार निर्देशांकाने एप्रिल १९९३ मध्ये २,००० चा नीचांक नोंदवला. उच्चांकापासून ५६ टक्क्यांची घसरण १२ महिन्यांत झाली.

*  केतन पारेखच्या संगणक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागाच्या तेजीत फेब्रुवारी २००० साली मुंबई शेअर बाजार निर्देशांकांनी ६,१५०च्या उच्चांकावरून २८ सप्टेंबरला २००१ साली २,६००चा नीचांक नोंदवला / निफ्टी निर्देशांक १,८१८ वरून ८४९ च्या नीचांकाला आला. उच्चांकापासून ५६ टक्क्यांची घसरण १९ महिन्यांत झाली.

*  वर्ष २००८ मध्ये जागतिक मंदीच्या अगोदर १० जानेवारीला मुंबई शेअर बाजार निर्देशांकांनी २१,२०० च्या उच्चांकावरून ऑक्टोबर २००८ साली ७,७०० चा नीचांक नोंदविला / निफ्टी निर्देशांकाने ६,३५७ वरून २,२५२ चा नीचांक नोंदविला. उच्चांकापासून ६० टक्क्यांची घसरण अवघ्या नऊ महिन्यांत झाली.

*  फेब्रुवारी २०१६ च्या मंदीत, ३१ मार्च २०१५ ला मुंबई शेअर बाजार निर्देशांकांनी ३०,००० च्या उच्चांकावरून २९ फेब्रुवारी २०१६ रोजी २२,४९४चा नीचांक नोंदविला. निफ्टी निर्देशांक ९,११९ वरून ६,८२५चा नीचांक नोंदवला. उच्चांकापासून २५ टक्क्यांची ही घसरण ११ महिन्यांत झाली.

हा मंदीचा इतिहास पाहता मंदी टिकण्याचा किमान कालावधी हा चार महिने तर कमाल कालावधी हा १९ महिन्यांचा आहे, तर या कालावधीत किमान घसरण ही २५ टक्के, तर कमाल घसरण ही ६० टक्के आहे.

पण आताची मंदी ही २० जानेवारीला मुंबई शेअर बाजार निर्देशांकावर ४२,२७३ चा उच्चांक मारत १३ मार्चला विक्रीचे दहा टक्क्यांचे खालचे सर्किट लागत २९,३८८ चा नीचांक नोंदविला गेला. बरोबरीने निफ्टी निर्देशांकाने १२,४३० च्या उच्चांकावरून ८,५५५ चा नीचांक नोंदवला. उच्चांकापासून ३० टक्क्यांची घसरण ही कामकाज झालेल्या अवघ्या ४० दिवसांच्या आत कुठेही उसंत, भरीव सुधारणा न होता अल्पावधीत घडली, जे मोठय़ा चिंतेचे कारण आहे.

आता तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत भविष्यकालीन निर्देशांकाच्या वाटचालीचा आढावा घेऊया.

सेन्सेक्सवर आतापर्यंत १२,८८५ अंशांची (४२,२७३ ते २९,३८८) घसरण झाली आहे.  आणि निफ्टीवर ३,८७५ अंशांची (१२,४३० ते ८,५५५) घसरण झाली आहे. आता सेन्सेक्सवरील १२,८८५ आणि निफ्टीवरील ३,८७५ या घसरण मात्रांचे अध्रे (५० टक्के) हे अनुक्रमे सेन्सेक्सवर ६,४४२ आणि निफ्टीवर १,९३७ अंश येतात. हे आकडे सरलेल्या शुक्रवारच्या नीचांकाच्या अनुषंगाने, सेन्सेक्सवर ३५,८३० (२९,३८८ + ६,४४२) आणि निफ्टीवर १०,४९२ (८,५५५ + १,९३७) येतात. भविष्यात सेन्सेक्सवर ३५,८३० आणि निफ्टीवर १०,४९२ या पातळ्यांना अनन्यसाधारण महत्त्व असेल. जे ‘फेबुनासी फॅक्टर’चे ०.५० टक्के आहेत. भविष्यात निर्देशांक सातत्याने या स्तरावर एक महिना टिकला तर निर्देशांक मंदीच्या गत्रेतेतून बाहेर आला असे समजण्यास हरकत नाही आणि सेन्सेक्सचे वरचे लक्ष्य ३७,३५० ते ३८,००० आणि निफ्टीवर ११,००० ते ११,५०० असे असेल. ही नाण्याची एक बाजू झाली.

आता नाण्याची दुसरी क्लेशकारक बाजू. भविष्यात निर्देशांक – सेन्सेक्सवर ३५,८३० आणि निफ्टीवर १०,४९२ चा स्तर राखण्यात अपयशी ठरल्यास आताचा घातक उतार आपण पुन्हा अनुभवू शकतो. भविष्यात निर्देशांकाचे खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर २२,९४५ (३५,८३०-१२,८८५) आणि निफ्टीवर ६,६१७ (१०,४९२ – ३,८७५) असे असू शकेल. हे जानेवारी २०२१ पर्यंत साध्य होईल. या स्तरावर निर्देशांकावरची सूज जाऊन, निर्देशांक पुन्हा बाळसे धरेल. कारण पूर्वी १९९२ आणि २००८ साली ५० टक्क्यांचे घातक उतार येऊनही बाजारांनी नंतर नवीन उच्चांकाला गवसणी घातली आहे. त्यामुळे २०२४ साली सेन्सेक्सचे वरच किमान लक्ष्य हे ४९,००० आणि निफ्टीवर १४,००० असे असेल.

* लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Story img Loader