व्याजदर बदलाचे अधिकार असलेल्या पतधोरण आढावा समितीच्या मंगळवारपासून सुरू असलेल्या तीन दिवसांच्या बैठकीअंती गुरुवारी रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दरात कोणतीही कपात न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेपो दर ५.१५ टक्क्यांवर कायम राहिला आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास हे रेपो दरात आणखी पाव टक्क्यांची कपात जाहीर करतील, अशी सार्वत्रिक अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली. सलग पाच वेळा रेपो दरात कपात केल्यानंतर त्याला डिसेंबरमध्ये ब्रेक लागला आहे. त्यामुळे रिव्हर्स रेपो रेट ४.९० टक्क्यांवर काय राहिला आहे.

आर्थिक वर्षांतील पाचवे द्विमासिक पतधोरण रिझव्‍‌र्ह बँक गुरुवारी जाहीर केले. चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत पाच टक्क्यांच्याही खाली घरंगळलेला विकास दर आणि वाढलेल्या महागाई दराच्या पूर्वपीठिका पाहून रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण आढावा बैठकीत रेपो दर कपातीचा निर्णय होईल अशी अपेक्षा होती.

रिझर्व्ह बँकेने या अंदाजातही केला बदल
देशाचा आर्थिक वृद्धीदर ६.१ टक्के राहील, अशी शक्यता रिझर्व्ह बँकेने म्हटले होते. पण, या अंदाजात बदल करून देशाचा आर्थिक वृद्धीदर ५ टक्क्यांवर आणला आहे.

सेन्सेक्सला बसला फटका
रिझर्व्ह बँक रेपो दरात कपात करेल अशी सर्व गुंतवणूकदारांना अपेक्षा होती. मात्र, पतधोरण समितीने धक्का दिला. रेपो दरात कोणतीही कपात केली नाही. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी काही क्षणात खाली आला.